
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता विडंबनात्मक काव्य सादर करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या स्टुडिओची शिंदेंच्या शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली. मात्र, तरीही कुणाल कामराने माफी मागण्यास नकार दिला आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री याआधी जे बोलले, तेच मी बोललो आहे. त्यामुळे मी लपून बसत प्रकरण शांत होण्याची वाट पाहणार नाही, अशा शब्दांत कामराने शिंदे यांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला.
मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावून मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पण तो हजर न झाल्याने पोलिसांनी त्याच्या मुंबईस्थित घरी जाऊन त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण तो घरीही आढळला नाही. अखेर कामराने ४ पानी निवेदन सादर केले. कामरा म्हणाला की, “मी आता मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजवर (प्रभादेवी) पुढचा शो आयोजित करणार आहे. माझ्या पुढच्या कार्यक्रमाचे ठिकाण असे असेल, जे पाडण्याची अधिक गरज आहे. मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील अशा इमारतीची निवड करेन जी पाडण्याची गरज आहे.”
“मला या जमावाची भीती वाटत नाही. मी काहीही चुकीचे बोललो नाही. मनोजरंजनाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला ते फक्त एक व्यासपीठ आहे. त्यामुळे हॅबिटेट स्टुडिओ माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. मी काय बोलतो किंवा करतो याचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचा यात संबंधही नाही. विनोदी कलाकारांच्या शब्दांसाठी अशा सेटवर हल्ला करणे म्हणजे चिकन दिले नाही म्हणून तुम्ही टोमॅटोचा ट्रक पलटी केल्यासारखी निरर्थक गोष्ट आहे. माझ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी पोलीस आणि न्यायालयाला सहकार्य करण्यास तयार आहे,” असेही त्याने सांगितले.
राजकीय व्यवस्थेची खिल्ली उडवणे कायद्याविरोधात नाही!
भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची खुशामत करण्यासाठी केला जाऊ नये. एका ताकदवान व्यक्तीवर एक विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलू शकत नाही. माझ्या माहितीनुसार, आमच्या नेत्यांची आणि राजकीय व्यवस्थेची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही, असेही त्याने नमूद केले.