कुर्ला, अंधेरीकरांना डबलडेकर बसचा गारेगार प्रवास

प्रवाशांचा प्रवास गारेगार व आरामदायी व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील एसी डबलडेकर बसेस २१ फेब्रुवारी २०२३ पासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कुर्ला, अंधेरीकरांना डबलडेकर बसचा गारेगार प्रवास

मुंबई : कुर्ला-अंधेरी पूर्व व अंधेरी पूर्व ते सीप्झ दरम्यान इलेक्ट्रिक वातानुकूलित डबलडेकर बससेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक ते वांद्रे पूर्व दरम्यान डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्यानंतर आता कुर्ला-अंधेरी, अंधेरी-सीप्झ दरम्यान प्रवाशांना डबलडेकर बसचा गारेगार प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

जुन्या डबलडेकर बसेसची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वातानुकूलित डबलडेकर बसेस दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला मुंबई शहरात डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावल्यानंतर आता पूर्व व पश्चिम उपनगरातही एसी डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावत आहेत. सोमवार, ११ डिसेंबरपासून कुर्ला-अंधेरी, अंधेरी पूर्व ते सिप्झ डबलडेकर बस सेवा सुरू केली आहे. ३१० या बस मार्गावर वांद्रे बस टर्मिनस ते कुर्ला स्टेशन पश्चिम बस स्थानक या दरम्यान १० बसेस चालवण्यात येत आहेत, तर आणखीन १० वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या सोमवारपासून ३३२ या बस मार्गावर कुर्ला बस आगार ते अंधेरी पूर्व याद्वारे ४१५ या बसमार्गावर आगरकर चौक (अंधेरी पूर्व) ते सीप्झ टर्मिनस या दरम्यान प्रवर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांचा प्रवास गारेगार व आरामदायी व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील एसी डबलडेकर बसेस २१ फेब्रुवारी २०२३ पासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्ट उपक्रमातर्फे ४५ वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसेसचे दक्षिण मुंबईत व मुंबई उपनगगरात प्रवर्तन करण्यात येत आहे. या बसगाड्या पर्यावरणपूरक असून या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायुप्रदूषण होत नाही. तसेच प्रवाशांच्या सोईसाठी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, दोन स्वयंचलित प्रवेशद्वार, सीसीटीव्ही या बसेसमध्ये बसवण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावणाऱ्या एसी डबलडेकर बसने प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in