Kurla bus Accident: मानवी चूक व अपुऱ्या प्रशिक्षणाने केला घात; कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेविषयी आरटीओ अधिकाऱ्यांचा निष्कर्ष

Kurla best bus Accident: मुंबईतील कुर्ला भागात सोमवारी रात्री घडलेल्या भीषण बेस्ट बस अपघातामागे ‘मानवी चूक’ आणि ‘अपुरे प्रशिक्षण’ कारणीभूत असल्याचा संशय प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाले आहेत.
Kurla bus Accident: मानवी चूक व अपुऱ्या प्रशिक्षणाने केला घात; कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेविषयी आरटीओ अधिकाऱ्यांचा निष्कर्ष
Published on

मुंबई : मुंबईतील कुर्ला भागात सोमवारी रात्री घडलेल्या भीषण बेस्ट बस अपघातामागे ‘मानवी चूक’ आणि ‘अपुरे प्रशिक्षण’ कारणीभूत असल्याचा संशय प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाले आहेत.

सोमवारी रात्री ९.३० वाजता एस. जी. बर्वे मार्गावर ही इलेक्ट्रिक बस पादचाऱ्यांना आणि वाहनांना धडक देत गृहनिर्माण संस्थेच्या भिंतीवर आदळली. यानंतर, वडाळा आरटीओच्या तपास पथकाने मंगळवारी बेस्टच्या कुर्ला डेपोत बसची तपासणी केली. ‘बसचे ब्रेक्स व्यवस्थित काम करत असल्याचे तपासणीत आढळले आहे,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी अधिक तपशील ओलेक्ट्रा आणि बेस्टकडून मागवले जात आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमधून दुर्घटनेचे चित्र

बसच्या आत बसवलेल्या तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार, ‘संपूर्ण घटना फक्त ५२ ते ५५ सेकंदांत घडली,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बसने पहिले वाहन धडकवल्यानंतर, ती अंदाजे ४५० मीटर अंतर कापत एका गृहनिर्माण संस्थेच्या भिंतीवर धडकली.

चालकाच्या अनुभवाविषयी परस्परविरोधी विधाने

बेस्ट व्यवस्थापनाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी चालकाला ३ दिवसांचे इंडक्शन प्रशिक्षण दिले होते, असे सांगितले. परंतु, चालकाच्या मुलाने सांगितले की, त्याला ९-१० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. बेस्टच्या नोंदीनुसार, संजय मोरे हे २०२० पासून ७-९ मीटर लांबीच्या मिनी बस चालवत होते, परंतु १२-मीटर इलेक्ट्रिक बस चालवण्याचा त्यांना अनुभव नव्हता.

स्वयंचलित बस आणि अनुभवातील फरक

निवृत्त आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, स्वयंचलित ट्रान्समिशन इलेक्ट्रिक बस आणि पारंपरिक इंधन बस यांची यंत्रणा वेगळी आहे. अशा बस चालवण्यासाठी विशिष्ट ज्ञान आणि अनुभवाची आवश्यकता असते. ‘मानवी चूक ही मुख्यतः अपुऱ्या ज्ञानामुळे झाली आहे,’ असे त्यांनी सांगितले.

अपघातानंतरच्या पुढील कारवाईची तयारी

महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले की, बसचे तपासणी अहवाल ओलेक्ट्रा कंपनीच्या अभियंत्यांकडून अजून येणे बाकी आहे. आरटीओ पथकाने त्यांच्या मानक कार्यपद्धतीनुसार तपासणी केली असून हा अहवाल मुंबई पोलिसांना सादर केला जाणार आहे. या अपघातामागे ब्रेक फेलऐवजी मानवी चूक आणि अनुभवाचा अभाव असल्याचे दिसून येते. अपुऱ्या प्रशिक्षणामुळे चालकास गती नियंत्रित करण्यात आलेली चूक अपघाताचे मुख्य कारण ठरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बेस्ट बसने अजून एकाला चिरडले तर

अवघ्या दोन दिवसांपूर्वी कुर्ला बेस्ट बस अपघाताची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा एकदा सीएसएमटी स्थानकाजवळ बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली येऊन एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या पादचाऱ्याला दुचाकीने धडक दिल्याने तो बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली पडून चिरडला गेला. दरम्यान, या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास बस A-२६/Sr.३३ बस क्रमांक ६९७२ अणुशक्ती नगर ते इलेक्ट्रिक हाऊसच्या दिशेने निघाली होती. ही बस ४.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वालचंद हिराचंद मार्ग आयुक्त कार्यालयाजवळ आली असता एक पादचारी बसला धडकला. यावेळी बेस्टचा चालक ज्ञानदेव जगदाळे हे बस चालवत होते, बसमध्ये नंदकिशोर लांबखडे हे कंडक्टर होते.

गोरेगावात दुचाकीला बेस्ट बसची धडक

गोरेगाव अप दिशेने बस मार्ग नं ४४७ (गाडी क्रमांक १८५४) संतोष नगर येथून सायंकाळी ५.३० वाजता जात असताना गाई वासरू चौकच्या अगोदर एक दुचाकी रस्त्यावर उभी होती. तिला बसचा धक्का लागून ती दुचाकी पडली. मात्र, या धडकेदरम्यान दुचाकीवर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

logo
marathi.freepressjournal.in