कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण : मोरेच्या चुकीमुळेच अपघात; पोलिसांचा जामिनाला विरोध, १० जानेवारीला न्यायालयाचा निर्णय

कुर्ला येथील बेस्ट बस अपघातप्रकरणी अटक केलेल्या चालक संजय मोरेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले.
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण : मोरेच्या चुकीमुळेच अपघात; पोलिसांचा जामिनाला विरोध, १० जानेवारीला न्यायालयाचा निर्णय
Published on

मुंबई : कुर्ला येथील बेस्ट बस अपघातप्रकरणी अटक केलेल्या चालक संजय मोरेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्याच्या चुकीमुळे अपघात घडला, असा दावा करीत पोलिसांनी शनिवारी संजय मोरेच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. त्यावर मोरेच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत अतिरिक्त सत्र न्या. विवेकानंद पाताडे यांनी सुनावणी १० जानेवारीला निश्चित केली. त्या दिवशी जामिनाचा निर्णय देण्याची शक्यता आहे.

९ डिसेंबरला बेस्टच्या भरधाव एसी बसने अनेक पादचाऱ्यांना चिरडले आणि कित्येक वाहनांना धडक दिली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले. याप्रकरणी बसचालक संजय मोरेला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याचदरम्यान त्याने ॲड. समाधान सुलाने यांच्यामार्फत सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेकानंद पाताडे यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी कुर्ला पोलिसांच्या वतीने सरकारी वकील प्रभाकर तरांगे यांनी मोरेच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. मोरेच्या चुकीमुळेच भीषण अपघात घडला आणि १० निष्पाप नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे, असा युक्तिवाद ॲड. तरांगे यांनी केला. त्यावर आरोपी मोरेतर्फे ॲड. सुलाने यांनी बाजू मांडली. आपल्याला नाहक टार्गेट केले जात असल्याचा दावा  केला. दोघांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने १० जानेवारीला जामीन अर्जावर निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. 

पोलिसांनी गुरुवारी लेखी उत्तर सादर केले होते. त्यावेळी त्यांनी अपघात झालेल्या बेस्टच्या बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता. तसेच मोरेने ड्रायव्हिंग करताना मद्यप्राशन केले नव्हते, असा दावा लेखी उत्तरातून केला होता. त्याचीही नोंद न्यायालयाने घेतली आहे.

logo
marathi.freepressjournal.in