MUMBAI : कुर्ला अपघात; बसचालकाला जामीन मंजूर

कुर्ला येथे डिसेंबर २०२४ मध्ये पादचारी व वाहनांना बेस्ट बसने धडक दिली होती. या अपघातातील आरोपी बेस्ट चालक संजय मोरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
MUMBAI : कुर्ला अपघात; बसचालकाला जामीन मंजूर
MUMBAI : कुर्ला अपघात; बसचालकाला जामीन मंजूर
Published on

ऊर्वी महाजनी / मुंबई:

कुर्ला येथे डिसेंबर २०२४ मध्ये पादचारी व वाहनांना बेस्ट बसने धडक दिली होती. या अपघातातील आरोपी बेस्ट चालक संजय मोरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी ३० मार्च रोजी मोरे याला जामीन मंजूर केला. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मोरे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत सदोष मनुष्यवध, गंभीर दुखापत करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अहवालाचा आधार घेत सत्र न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला होता. या अहवालात बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे म्हटले होते हा अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे किंवा बिघाडामुळे झाला असावा, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे नमूद केले होते.

उच्च न्यायालयात मोरेचे वकील अद्वैत शुक्ला, नीतू सिंग आणि अमनदीप सिंग स्रा यांनी युक्तिवाद केला की, मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचे योग्य प्रशिक्षण दिले नव्हते. त्यांच्या नियुक्ती करारानुसार किमान सात दिवसांच्या प्रशिक्षणाची गरज असताना, त्याला केवळ तीन दिवस आणि तेही पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच, न्यायवैद्यक अहवालात अपघाताच्या वेळी तो कोणत्याही अमली पदार्थाच्या किंवा मद्याच्या प्रभावाखाली नसल्याचे स्पष्ट झाले.

वकिलांनी नमूद केले की, हे प्रकरण बीएनएसच्या कलम १०६ अंतर्गत 'हलगर्जीपणामुळे झालेला मृत्यू' असे मानले जावे, ज्यामध्ये जास्तीत जास्त पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. मोरेने आधीच सुमारे १५ महिने तुरुंगात घालवले आहेत आणि खटला पूर्ण होण्यास बराच वेळ लागू शकतो, कारण फिर्यादी पक्ष ९६ साक्षीदारांची तपासणी करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in