
मुंबई : बेस्ट बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुर्ला रहिवासी कन्निज अन्सारी यांच्या मृतदेहावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कन्निज अन्सारी यांचा मृतदेह कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयातून शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेला जात असताना कुटुंबीयांकडे रुग्णवाहिका, औषधे आणि अंत्यविधीसाठी पैसे मागितल्याचा दावाही करण्यात आला आहे.
कन्निज अन्सारी यांच्या एका नातेवाईकाने सांगितले की, आम्ही रुग्णवाहिकेसाठी ९०० रुपये मोजले. आम्हाला कोणतीही सुविधा मिळाली नाही. महाराष्ट्र सरकारने बस अपघातातील बळींच्या कुटुंबीयांसाठी जाहीर केलेली भरपाई समाधानकारक नसल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
कन्निज अन्सारी (५५) यांचे जावई अबिद शेख यांनी या अपघाताचे भयंकर अशा शब्दात वर्णन केले असून तो सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोर तरळत असल्याचेही ते म्हणाले. कन्निज अन्सारी यांना भाभा रुग्णालयात आणले असता त्यांच्या कानात सोन्याचे कानातले होते, असे शेख यांनी सांगितले. नंतर मृतदेह दुसऱ्यांदा पाहिला असता त्यांचे कानातले गायब होते. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना याबाबत सांगितले. मात्र त्यांनी पंचनामा होईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले, असे शेख म्हणाले.
कन्निज अन्सारी या कुर्ला (पश्चिम) येथील रहिवासी होत्या. कन्निज अन्सारी या दोन मुलांच्या आई होत्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार होत्या. त्यांचे पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. कन्निज अन्सारी यांना भाभा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. कन्निज अन्सारी यांच्या अन्य एक नातेवाईक समीर अन्सारी यांनी सांगितले की, बेस्टचे चालक अनेकदा अत्यंत बेजबाबदारपणे बस चालवतात. आम्ही अशा बसचालकांविरोधात अनेक वेळा तक्रार केली आहे. मात्र त्यावर पुढे काहीच होत नाही. यातून सरकारचे अपयश दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये देसाई रुग्णालयातील सेविका कन्निज अन्सारी यांचाही समावेश दुर्दैवी ठरला. त्या रात्री त्या ९ वाजता बाहेर पडल्या होत्या, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. बसमुळे त्यांचा रुग्णालयानजीक मृत्यू झाला.सोमवारी रात्री कुर्ल्याच्या रस्त्यांवर भीषण अपघात घडला. यामध्ये सात निष्पाप जीवांना प्राण गमवावे लागले.
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – खासदार गायकवाड
मुंबई : कुर्ला येथील बेस्ट बस दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांनी म्हटले आहे की, बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना असून ती मन पिळवटून टाकणारी आहे. अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावी तसेच पीडित कुटुंबांना आवश्यक मदत केली पाहिजे. घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मृतांच्या वारसांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळणारी आहे. ही मदत अत्यंत तुटपंजी असून मृतांच्या वारसांना प्रत्यकी २५ लाख रुपये दिले पाहिजेत, असे गायकवाड म्हणाल्या.
दुर्घटना चिंताजनक - रामदास आठवले
मुंबई : कुर्ला येथील दुर्घटना मुंबईकरांसाठी चिंताजनक आणि धोक्याची घंटा आहे. अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पुन्हा असे अपघात होणार नाहीत याची सर्व खबरदारी उपाययोजना राज्य सरकारने कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. अपघातात जखमींनाही राज्य सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे. अपघातातील मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने ने घ्यावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
कन्निज अन्सारी यांच्या कुटुंबीयांनी हा प्रकार आमच्या निदर्शनास आणला आहे. आम्ही रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि याबाबतची सत्यता स्पष्ट झाल्यानंतर योग्य कारवाई संबंधितांवर करू.
- पद्मश्री अहिरे,वैद्यकीय अधीक्षक,भाभा रुग्णालय.