

मुंबई : गेल्या वर्षी कुर्ल्यात बेस्टचालकाने दिलेल्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू आणि ४२ जण जखमी झाले होते. या प्रकरणातील खटला लवकरच सुरू होणार आहे. न्यायालयाने आरोपी चालकावर खुनाचा हेतू नसलेल्या मनुष्यवधासह इतर कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. बेस्टचे बस चालक संजय मोरे याने १० डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता कुर्ला (पश्चिम) येथील एस. जी. बर्वे मार्गावर बसवरील नियंत्रण गमावल्याने ती अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडकली होती. या अपघातानंतर मोरेला अटक करण्यात आली होती.
गेल्या महिन्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी मोरेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५ (खुनाचा हेतू नसलेला मनुष्यवध), कलम १०० (खुनाचा हेतू नसलेला मनुष्यवध करण्याचा प्रयत्न), कलम ११८(१) (जाणीवपूर्वक दुखापत करणे) आणि इतर संबंधित कलमांखाली आरोप निश्चित केले.
या खटल्यात मोरे दोषी ठरल्यास त्याला मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
यापूर्वी न्यायालयाने या प्रकरणातील इतर दोन आरोपी ईव्ही ट्रान्स (मुंबई) प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रमेश काटीगंडला आणि मोर्या ट्रान्स इंडिया प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राम सूर्यवंशी यांना पुरावे अपुरे असल्याचे सांगत निर्दोष मुक्त केले होते.