कुर्ला इमारत दुर्घटना मृतांचा आकडा १९ वर , काहीजण अद्याप बेपत्ता

ज्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत, अशा धोकादायक इमारतींतील रहिवाशांनी पालिकेने नोटीस बजावल्यावर इमारत तात्काळ रिकामी करणे आवश्यक
कुर्ला इमारत दुर्घटना मृतांचा आकडा १९ वर , काहीजण अद्याप बेपत्ता
ANI

रिमझिम पाऊस, थंडगार वातावरण, रात्रीचे ११ वाजून गेल्यामुळे झालेली झोपण्याची वेळ... अशा बेसावध वेळी कुर्ला पूर्व, शिवसृष्टी रोड, एसटी बस आगाराजवळील नाईक नगर सोसायटीचा ‘ए’ विंगचा भाग पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि या दुर्घटनेत १९ जणांवर काळाने झडप घातली आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तसेच काहीजण अजूनही बेपत्ता असल्याची माहितीही समोर येत आहे. या दुर्घटनेत नाईक नगर सोसायटीतील ए विंग मधील १४ रहिवाशांना झोपेतचं जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. १३ जखमींवर राजावाडी व सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, २०१६ मध्ये मुंबई महापालिकेने ही इमारत अतिधोकादायक म्हणून जाहीर केली होती.

राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयाची मदत!

कुर्ल्यातल्या इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्यसरकारने ५ लाख रुपयाची आर्थिक मदत आणि जखमींवर मोफत उपचार करण्याचे जाहिर केले. मंत्री सुभाष देसाई यांनी याबाबतची घोषणा केली. ज्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत, अशा धोकादायक इमारतींतील रहिवाशांनी पालिकेने नोटीस बजावल्यावर इमारत तात्काळ रिकामी करणे आवश्यक आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी रहिवाशांना आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे दोन वेळा घटनास्थळी

कुर्ल्यातील इमारत कोसळल्याची माहिती समजताच पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मध्यरात्री दोन वाजता आणि मंगळवारी दुपारी तीन वाजता असे दोनवेळा घटनास्थळी भेट दिली. घटनेची भीषणता लक्षात घेऊन संबंधित अधिकारी आणि यंत्रणेशी संवाद साधून मदत व बचावकार्याला वेग आणण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या. अग्निशमन दल व एनडीआरएफच्या जवानांकडून रात्र व दिवसभर बचावकार्य सुरू होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in