कुर्ला अपघात : चालकाचा अवजड वाहन परवाना रद्द

कुर्ला येथील बेस्ट बस अपघातानंतर परिवहन विभागाने आरोपी चालक संजय मोरे यांचा अवजड वाहनांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
कुर्ला अपघात : चालकाचा अवजड वाहन परवाना रद्द
Published on

मुंबई : कुर्ला येथील बेस्ट बस अपघातानंतर परिवहन विभागाने आरोपी चालक संजय मोरे यांचा अवजड वाहनांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. मोरे याचा हलकी वाहने आणि दुचाकीचा परवाना वैध राहील. ९ डिसेंबर २०२४ रोजी कुर्ला पश्चिम येथे मोरे याने चालवलेली बेस्ट बस पादचारी आणि वाहनांवर आदळली होती. या अपघातात अनेक जण ठार झाले होते, तर ४० हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी ३० मार्च रोजी उच्च न्यायालयाने मोरे यांना जामीन मंजूर केला.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. 'अवजड वाहने चालवताना मोठी जबाबदारी असते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परवाना कायमस्वरूपी रद्द या प्रकरणात करण्यात आला आहे', असे एका वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्याने सांगितले. या प्रणालीत ब्लॉक आणि निलंबित करण्याचे पर्याय आहेत. सुनिश्चित अंमलबजावणी करण्यासाठी 'वडाळा आरटीओ'च्या अधिकाऱ्यांनी आयुक्तालयाला पत्र लिहून या प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

तांत्रिक मर्यादेमुळे अडचण

परवाना व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणाऱ्या 'सारथी ४.०' प्रणालीत थेट परवाना रद्द करण्याची सुविधा नसल्याची तांत्रिक मर्यादा अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे थेट परवाना रद्द करण्यासाठी आयुक्तालयाला पत्र लिहावे लागले.

logo
marathi.freepressjournal.in