अंधेरीतील कामगार रुग्णालय १४ ऑगस्टपासून सेवेत

पहिल्या टप्यात ओपीडी रुग्ण सेवेत येईल
अंधेरीतील कामगार रुग्णालय १४ ऑगस्टपासून सेवेत

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील ईएसआयसी कामगार रुग्णालयात १७ डिसेंबर २०१८ रोजी आग लागल्यानंतर पाच वर्षे बंद होते. यावर कामगारांनी नाराजी व्यक्त केली. परंतु केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार करत तांत्रिक अडचणी मांडत सतत पाठपुरावा केला. अखेर तांत्रिक गोष्टींवर तोडगा निघाला असून १४ ऑगस्टपासून कामगार रुग्णालय रुग्णसेवेत येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांनी दिली.

१७ डिसेंबर २०१८ मध्ये कामगार रुग्णालयात अग्निभडका उडाला आणि त्यानंतर रुग्णालय बंद करण्यात आले होते. रुग्णालय सुरब करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीत जाऊन भूमिका घेत कामगारांची व्यथा मांडून हॉस्पिटलच्या तांत्रिकदृष्ट्या अडचणी दूर करून रुग्णसेवेसाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनतर कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी कामगार रुग्णालयावर जोर दिल्यानंतर २९ जुलै २०२२, ११ जानेवारी २०२३ व २१ फेब्रुवारी २०२३ रोजी रुग्णालय काम सुरू करण्यासाठी नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडबरोबर बैठक पार पडली. त्यानंतर मुख्य अभियंता कामगार रुग्णालय आणि कार्यकारी संचालक एनबीसीसीच्या विविध बैठका रोजी पार पडल्या. अखेर एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडने कार्यादेश दिल्यानंतर ओपीडीचे काम तीन महिन्यांत पूर्ण झाले.

२ जुलै रोजी कामाची पाहणी केली असता, रुग्णालयाच्या इमारतीच्या ‘ए’ आणि ‘ई’ विंगच्या तळापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत ओपीडीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या १४ ऑगस्ट २०२३ रोजी पहिल्या टप्यात ओपीडी रुग्ण सेवेत येईल, असे मुतुला यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in