अग्निशमन दलातील कंत्राटी भरतीला कामगार सेनेचा विरोध

मुंबई अग्निशमन दलाच्या नाव-शिक्क्यासह बचावकार्यात वापरली जाणार आहेत.
 अग्निशमन दलातील कंत्राटी भरतीला कामगार सेनेचा विरोध

स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईची सुरक्षा करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलात कंत्राटी पद्धतीने भरती चुकीचा निर्णय आहे. आपत्कालीन परिस्थितीत कंत्राटदाराने हात वर केल्यास भयावह स्थिती व मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कंत्राटी पद्धतीवर भरतीला विरोध असून हा निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने दिला आहे.

पालिकेच्या सर्व प्रभाग स्तरावर जलद प्रतिसाद अग्निशमन वाहने कंत्राटी अग्निशमन कर्मचारी वर्गाच्या सहाय्याने मुंबई अग्निशमन दलाच्या नाव-शिक्क्यासह बचावकार्यात वापरली जाणार आहेत. याबाबत १३ जुलै रोजी स्थायी समितीत ठराव क्र. ५९५ मंजूरही झाला आहे; मात्र आगीसारख्या प्रसंगी बचावकार्य करताना ‘कंत्राटी’ असलेल्या अग्निशामकांनी कामचुकारपणा करून जबाबदारी झटकल्यास जीवित-वित्तहानी वाढून अग्निशमन दलाच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचू शकतो. यामुळे अग्निशमन दलात मूळ कर्मचारी, जवानांचेही खच्चीकरण होऊ शकते. त्यामुळे अग्निशामकांची कंत्राटी पद्धतीने भरती करू नये, यासाठी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वतीने राज्याचे प्रधान सचिव आणि पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in