केईएम रुग्णालयात वैद्यकीय साहित्य उपकरणांचा अभाव; मनसेचा आरोप

गेल्या काही दिवसांपासून केईएम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्याची कमतरता आहे.
 केईएम रुग्णालयात वैद्यकीय साहित्य उपकरणांचा अभाव; मनसेचा आरोप

योग्य उपचार पद्धतीमुळे पालिका रुग्णालयात सर्व प्रकारचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून केईएम रुग्णालयात वैद्यकीय साहित्य उपकरणांचा अभाव असल्याच्या तक्रारी येत असून, रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य खरेदीसाठी सुचविण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष निलेश इंदप यांनी केला. तसे तक्रार पत्र रुग्णालय प्रशासनाला दिल्याचे इंदप यांनी सांगितले. यावर बोलताना केईएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी हा आरोप खोडून काढत उलटपक्षी स्टॉपकॉक सारखे आणि इतरही वैद्यकीय साहित्य रुग्णालयात पुरेसे उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.

सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सतत वैद्यकीय साहित्याचा वाणवा असतो. त्याप्रमाणे रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक प्रशासनाकडे तक्रार करत असतात. इंदप यांच्याकडेदेखील केईएम रुग्णालयात साहित्य नसल्याची तक्रार आली होती. त्यानंतर इंदप यांनी त्याचा पाठपुरावा करत रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी इंदप म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून केईएम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्याची कमतरता आहे. यात रक्त चाचण्यांसाठी क्लॉट अक्टिवेटर किंवा प्लेन बल्ब, हिपॅरिन बल्ब, सायट्रेट प्लाझ्मा, ईटीडीए प्लाझ्मा, डायनाप्लास्ट, थ्रीवे स्टॉपकॉक सारखे महत्त्वाचे साहित्य आहे. तरीही या वस्तू रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेरील दुकानातून आणण्यास सांगितले जात असल्याचे इंदप म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in