
मुंबई : महिला लोकलमध्ये महिलांची भांडणे नित्याची झाली आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवार, १७ जूनला विरार महिला विशेष लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी झाली. या महिलांना भाईंदर स्थानकात उतरवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याठिकाणी दोन्ही महिलांनी आपापसात भांडण मिटवत एकमेकींविरोधात तक्रार दिली नाही. त्यामुळे या महिलांचे जबाब नोंदवून समज देऊन पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
मंगळवारी सायंकाळी भाईंदर स्थानकात येणाऱ्या महिला विशेष लोकलमध्ये हा प्रकार घडला. वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद
एक महिला नायगाव आणि एक विरार पूर्व येथे राहणारी आहे. गाडीतून उतरण्यावरून शाब्दिक बाचाबाची व हातापायी झाल्याचे या महिलांनी पोलिसांना सांगितले. घटनेची तक्रार देण्याकरिता वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे येथे जाऊया असे सांगितले असता त्यांनी एकमेकांविरुद्ध कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी तक्रार नसल्याचे सांगत आम्ही आपापसात भांडणे मिटवून घेत आहोत असे सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना तोंडी समज दिली. या बाबत वसईरोड रेल्वे पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद घेण्यात आली आहे.