
मुंबई : मालाड, मनोरी, मढसारख्या भागात असलेल्या ११ तलावांचे पुनरुज्जीवन पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नैसर्गिक समतोल राखण्याचा प्रयत्न पालिकेमार्फत केला जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी करून जीर्ण झालेल्या अस्वच्छ तलावांचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी उत्तर मुंबईतील अस्वच्छ आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या ११ तलावांच्या प्रस्तावित पुनरुज्जीवनाच्या योजना काही दिवसांपूर्वीच जाहीर केल्या. या तलावांचे सौंदर्यीकरण करून पाण्याची पातळी सुधारली जाईल, असे मत गोयल यांनी व्यक्त केले होते. याबाबत पालिकेचे पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांनी सांगितले की, उत्तर मुंबईमध्ये १८ तलावे आहेत. तलावाचे पुनरुज्जीवन मालाड विभागातून केले जाणार आहे. प्रभागातील तलावांमध्ये गावदेवी तलाव, राम नगरमधील भुजळे तलाव, अली तलाव, हरबादेवी तलाव, वनीला तलाव, भाटी तलाव आदींचा समावेश आहे.
पालिका अधिकारक्षेत्रात एकच तलाव
मालाडमधील १८ नैसर्गिक तलावांपैकी एक मालवणीमधील लोटस तलाव पालिका अधिकार क्षेत्रात आहे. उर्वरित तलावे मुंबई उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. २०२२च्या अखेरीस, पालिकेने मुंबई उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मालाडमधील सर्व १८ तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांच्या नियंत्रणातील किमान १६ तलाव पालिकेकडे सोपवण्याची विनंती केली होती. मात्र, जिल्हाधिकारी अधिकाऱ्याने अद्याप तलावांचे नियंत्रण सोपवलेले नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
…असे होईल तलावांचे पुनरुज्जीवन
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तलावे हस्तांतरित झाल्यानंतर ११ तलावांच्या सर्वेक्षणापासून पालिका सुरुवात करणार आहे. प्रत्येक तलावाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पुनर्संचयनासाठी एकसमान योजना असणार नाही. यासाठी पालिका प्रत्येक तलावासाठी कृती आराखडा तयार करणार आहे. हे प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबवले जाणार असून ज्या तलावाची सर्वाधिक घनता आणि जे तलाव सर्वात जास्त प्रदूषित असणार आहे. ते प्रकल्प आधी घेतले जाणार आहे. तर या तलावांचे नूतनीकरण सीएसआर निधीतून केले जाणार आहे.