‘स्वरमानस’ स्पर्धेतून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ‘लाख’मोलाची साथ

सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण करण्यात आलेल्या प्रक्षेपणाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
‘स्वरमानस’ स्पर्धेतून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ‘लाख’मोलाची साथ
Published on

मुंबई : 'एनी बडी कॅन सिंग’ या ब्रिद वाक्यानुसार लहान, मोठे व ज्येष्ठ नागरिकांमधील गाण्यांचे कौशल्य जगासमोर आणण्याबरोबरच त्यांच्यामध्ये अधिक आनंद निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या ‘स्वरमानस’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘सिंगेथॉन-२८’ या स्पर्धेतून जमा झालेला ‘लाख’मोलाचा निधी ‘विनायक दळवी चॅरिटेबल फाऊंडेशन’च्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिला. स्वरमानस ही संस्था सातत्याने अशाप्रकार कार्यक्रमाचे आयोजन करीत आपले सामाजिक दायित्व निभावत मोलाची साथ देत आहे.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी लहान गटात वैदिक दवळे (प्रथम), इवा फाटक (द्वितीय), सानवी वरेरकर (तृतीय), मोठ्या गटात अद्वय देसाई (प्रथम), मंदार देसाई (द्वितीय), सोहम भालेराव (तृतीय), पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेला सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसाने माडे आणि गायक कृषिकेश कामेरकर यांनी परिक्षक म्हणुन लाभले. प्रेक्षकांच्या पसंतीतून नील हेगडे व मंजिरी गायकवाड या दोन विजेत्यांची निवड करण्यात आली. सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण करण्यात आलेल्या प्रक्षेपणाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

सळसळत्या उत्साहाने भरलेल्या या कार्यक्रमाला मल्लखांब या खेळाचे विश्वगुरू, तसेच नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले उदय देशपांडे यांचा सन्मान पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या जादुई आवाजाने उत्तरा केळकर यांनी गाणी सादर करीत रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी मानवाच्या आनंदयात्री कार्याचा गौरव केला. खास लोकाग्रहास्तव २५ फेब्रुवारीला सायंकाळी ४ ते ६ यावेळात दादर येथे मोफत शिबराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सिंगेथॉन-२८’ या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाला गाण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि सामाजिक कार्याला हातभार लावणे हा हेतूही साध्य होत असून जास्तीत जास्त लोकांमध्ये गायनाच्या माध्यमातून आंनदही निर्माण होत आहे. अभिनय, नृत्य व गायन कलेत राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक पटकावणाऱ्या मानसी केळकर तांबे या ‘स्वरमानस’ संस्थापक व एक प्रशिक्षित समुपदेशिका आहेत.

logo
marathi.freepressjournal.in