लालबाग, अंधेरी दहिसरकरांना मिळणार शुद्ध पाणी; पाणी गळती, दूषित पाणी रोखण्यासाठी महापालिका करणार ४२ कोटी रुपये खर्च

मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
लालबाग, अंधेरी दहिसरकरांना मिळणार शुद्ध पाणी; पाणी गळती, दूषित पाणी रोखण्यासाठी महापालिका करणार ४२ कोटी रुपये खर्च

मुंबई : लालबाग, अंधेरी, खार, दहिसर आदी भागातील जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्याने पाणीपुरवठा अपुरा होतो आणि दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागातील जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय पालिकेच्या जलविभागाने घेतला आहे. यामुळे लालबाग, परळ, अंधेरी खार, दहिसर या भागात लवकरच मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा होईल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. १२० किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनद्वारे मुंबईला पाणीपुरवठा होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच पाणीचोरी व गळतीमुळे ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात अपुरा व दूषित पाणीपुरवठा होतो, अशा तक्रारी स्थानिकांकडून येत असतात. त्यामुळे जुन्या व जीर्ण झालेल्या जल वाहिन्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जलविभागाकडून सांगण्यात आले. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून पालिका ४१ कोटी रुपये खर्चणार आहे.

या भागातील जल वाहिन्या बदलणार!

पश्चिम उपनगरातील एच. पूर्व या खार, सांताक्रूझ पूर्व आणि पश्चिम के, पश्चिम या अंधेरी पश्चिम आणि पूर्व आणि मालाड, दहिसर पश्चिम, गोरेगाव पश्चिम या भागात १०० मिमी, १५० मिमी, २५० मिमी आणि ३०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. यासाठी ९ कोटी ७१ लाखांचा खर्च अपेक्षित असून निविदा काढण्यात आली आहे.

येथील जलवाहिन्या बदलणार!

तसेच मध्य मुंबईतील जी. दक्षिण या प्रभादेवी भागातील, जी. उत्तर या दादर, धारावी, माटुंगा भागात, एफ. उत्तर माटुंगा, किंग्ज सर्कल आणि एफ. दक्षिण या परळ, लालबाग आदी भागांतील जलवाहिन्या बदलून दूषितीकरण आणि गळती रोखण्याचे काम केले जाणार आहे. या कामांसाठीही ३१ कोटी ९२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in