‘लालबागचा राजा’ मंडळावर गुन्हे दाखल करा; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लालबागच्या राजाचे विसर्जन हे चंद्रग्रहण काळात झाले. त्यामुळे लाखो गणेश भाविकांच्या भावना दुखावल्या. विसर्जनावेळी कोळी समाजाला जाणूनबुजून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. उत्सव काळात भाविकांना हीन वागणूक देण्यात आली. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. तसेच, व्हीआयपी संस्कृतीला आटोक्यात आणण्यासाठी दर्शन प्रक्रियेत बदल करून फक्त...
‘लालबागचा राजा’ मंडळावर गुन्हे दाखल करा; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
एएनआय
Published on

मुंबई : गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन हे चंद्रग्रहण काळात झाले. त्यामुळे लाखो गणेश भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, विसर्जनावेळी कोळी समाजाला जाणूनबुजून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, उत्सव काळात भाविकांना हीन वागणूक देण्यात आली. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कोळी महिलांचे अस्तित्व टिकविण्याकरिता मागितलेला नवस पूर्ण झाल्यानंतर सन १९३४ साली लालबागचा राजा गणपतीची स्थापना कोळी समाजातील मासे विक्रेत्या महिलांनी केली. कालांतराने अनेक गणेश भक्तांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होऊ लागल्याचा अनुभव आल्यानंतर लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती असल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे लाखो भाविक लालबागच्या राजाच्या चरणी भेटवस्तू अर्पण करतात. यातून, मंडळ गडगंज श्रीमंत झाले आहे. परिणामी, सामान्य भाविकांना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून हीन वागणूक देण्यात येते, यासाठी कृती समितीच्या वतीने मंडळाविरोधात तक्रार केल्याची माहिती तांडेल यांनी दिली.

वर्षानुवर्षे लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा मुंबईतला कोळी बांधव करत असूनही यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व देण्यात आले. त्यामुळे समस्त कोळी बांधवांच्या आणि लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

या प्रकाराची सखोल माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.

विसर्जनाचा मान कोळी समाजाकडे असावा !

व्हीआयपी संस्कृतीला आटोक्यात आणण्याकरिता दर्शन प्रक्रियेत बदल करून व्हीआयपी दर्शनासाठी फक्त एक दिवस देण्याची मागणीही समितीने केली आहे. लालबागच्या राजाची स्थापना कोळी समाजाने केली असून राजाच्या विसर्जनाचा मान कोळी समाजाकडे शाबूत ठेवण्यात यावा, अशी मागणी मच्छिमार समितीकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in