लालबागचा राजाच्या विसर्जनात ‘विघ्न’; तब्बल ३३ तासांनंतर रविवारी रात्री उशिरा विसर्जन

तमाम गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या ‘लालबागचा राजा’वर रविवारी विसर्जनाचे ‘विघ्न’ ओढवले. ‘लालबागचा राजा’च्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या रात्री विसर्जन करण्याची वेळ मंडळावर आली. विसर्जनाला जो उशीर झाला त्यासाठी गुजरातचा नवा तराफा
लालबागचा राजाच्या विसर्जनात ‘विघ्न’; तब्बल ३३ तासांनंतर रविवारी रात्री उशिरा विसर्जन
छायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई : तमाम गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या ‘लालबागचा राजा’वर रविवारी विसर्जनाचे ‘विघ्न’ ओढवले. ‘लालबागचा राजा’च्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या रात्री विसर्जन करण्याची वेळ मंडळावर आली. तब्बल ३३ तासांनंतर अथक प्रयत्नांती ‘लालबागचा राजा’चे रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. समुद्रातील भरती आणि नव्या स्वयंचलित तराफ्यामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे विसर्जन प्रक्रिया लांबणीवर पडली. तरीही, भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यामुळे बाप्पाला भक्तिमय निरोप देण्यात यश आले.

‘लालबागचा राजा’ अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाल्यानंतर राजाच्या विसर्जनाचा मान कोळी बांधवांचा असतो. मात्र, यंदा लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने गुजरातहून हायटेक ऑटोमेटेड तराफा आणला होता. जुन्यापेक्षा नवीन तराफा तीनपट मोठा असल्याने सहजपणे विसर्जन सोहळा पार पडेल, असा अंदाज मंडळाला होता. मात्र, भरतीमुळे तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती चढवणे शक्यच झाले नाही. त्यामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले. अखेर खग्रास चंद्रग्रहण सुरू होण्यास काही मिनिटे शिल्लक असताना कोळी बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.

छायाचित्र : विजय गोहिल

शनिवार ६ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू झाली. लालबाग ते गिरगाव हे अंतर १० किलोमीटर इतके आहे. पण गिरगाव चौपाटीवर राजाची मिरवणूक येण्यासाठी २२ तास लागले. लालबागचा राजाची मूर्ती नव्या तराफ्यावर आरूढ होत नसल्यामुळे गेल्या अनेक तासांपासून हा गणपती समुद्रात चार ते पाच फूट पाण्यात बसून होता. यामुळे किनाऱ्यावर असलेले गणेशभक्त आणि लालबाग सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दाटले आहे. किनाऱ्यावर असलेले अनेक भक्त लालबागचा राजाची विनवणी करत होते. ‘चुकले असेल तर क्षमा असावी’, अशी विनवणी भक्तांकडून केली जात होती. अनेक अडचणींनंतर अखेर संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास मूर्ती तराफ्यावर आरुढ करण्यात आली. रात्री ८ वाजता लालबागच्या राजाची उत्तर आरती संपन्न झाली आणि रात्री ९ वाजून १० मिनिटांनी लालबागच्या राजाचे विसर्जन सुमारे ३३ तासांनंतर पूर्ण झाले. ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ असे म्हणत भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.

छायाचित्र : विजय गोहिल

“लालबागचा राजा गणपतीची मिरवणूक सुमारे ३३ तास चालली. सकाळी ८.३० ला आम्ही गिरगांव चौपाटीवर पोहोचलो होतो. गेले तीन दिवस तुफान पाऊस पडत असल्यामुळे आम्ही पोहोचायच्या १५ मिनिटे आधी भरतीला सुरुवात झाली. आम्ही जुन्या पद्धतीनुसारच विसर्जनाचा प्रयत्न केला, पण त्यात अपयश आले. विसर्जनाला जो उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे मी आभार मानतो. सर्व गणेशभक्त पाठिशी उभे राहिलात, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो,” असे लालबाग राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.

यंदा गुजरातच्या नव्या तराफ्यामुळे विलंब

“काही कारणांमुळे भरती-ओहोटीचा अंदाज ‘लालबागचा राजा’च्या मंडळाला आला नाही. आम्ही वाडकर बंधू बऱ्याच वर्षांपासून ‘लालबागचा राजा’चे विसर्जन करत आलेलो आहोत. आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेले नाही.

छायाचित्र : विजय गोहिल

गुजरातचा तराफा आल्यामुळे ‘लालबागचा राजा’ मंडळाने हे कंत्राट आमच्याऐवजी त्यांना दिले. ‘लालबागचा राजा’ मंडळाने विसर्जनाची यापुढे काळजी घ्यायला हवी,’ असे गिरगावातील नाखवा हिरालाल वाडकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in