
मुंबई : मालाड पश्चिमेकडील अथर्व महाविद्यालयासमोर ६.९१ एकर भूखंडावर बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आले. ६३ दुकानांसह झोपडपट्ट्यांवर पालिकेने केलेल्या कारवाईमुळे २० वर्षांनंतर भूखंड अतिक्रमण मुक्त झाला. त्यामुळे या जागेवर वैदिक थीम पार्क उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, पात्र ८ दुकानदारांना पर्यायी जागा किंवा आर्थिक मोबदला देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या पी. उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी बॅरिकेड्स लावून संरक्षित केले जाणार आहे.
मालाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर २७९७२ चौरस मीटर असलेला आरक्षित भूखंड मागील २० वर्षापासून अतिक्रमणाने व्यापला होता. उद्यानासाठी आरक्षित असलेला हा भूखंड ताब्यात घेऊन त्यावर वैदिक थीमपार्क उभारण्याचा प्रस्ताव खासदार गोपाळ शेट्टी यांचा होता. त्यांनी तशी प्रशासनाकडे मागणीही केली होती. मात्र अतिक्रमणात हा भूखंड अडकला होता. पालिकेने जुलै २०२३ मध्ये या भूखंडावरील सर्व संरचनांना जागा रिकामी करण्यासाठी नोटिसाही बजावल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
अखेर पालिकेच्या पी- उत्तर विभागाने पोलिस संरक्षणात या भूखंडावरील ६३ अनधिकृत फर्निचरची दुकाने व इतर बांधकामांवर कारवाई केली. त्यामुळे मागील २० वर्षापासून अतिक्रमणाने व्यापलेला हा भूखंड मोकळा झाला आहे. या भूखंडावर वैदिक थीमपार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. अतिक्रमणांवर कारवाईनंतर येथे संरक्षक भिंत बांधून अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षित केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या भूखंडावर असलेल्या ८ दुकानांची कागदपत्रे वैध असल्याने त्यांना पर्यायी जागा किंवा आर्थिक भरपाई दिली जाणार आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान एक कार्यकारी अभियंता, दोन सहाय्यक अभियंता, पाच उपअभियंता, सात कनिष्ठ अभियंता तसेच ६२ कामगारांसह ३० पोलीस उपस्थित होते. अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी एक मोठा पोकलेन, तीन जेसीबी, नऊ डंपरचा वापर करण्यात आला, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.