शिरीष पवार/मुंबई
मुंबईत महापालिकेने आतापर्यंत स्वयंचलित हवामान केंद्राची (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) १२० संयंत्रे बसविली असून मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणखी किमान ४० ठिकाणी अशी यंत्रणा बसविण्यासाठी दाटीवाटीच्या मुंबईत सुयोग्य जागा मिळणे कठीण बनले आहे.
मुंबई महापालिकेने बसविलेल्या या यंत्रणेतून भारतीय हवामान विभागाला येथील हवामानाच्या स्थिती, प्रारूपाबाबत अत्यंत उपयुक्त, तपशीलवार माहिती उपलब्ध होत आहे. हवामान विभागाची मुंबईत केवळ कुलाबा आणि सांताक्रुझ येथेच केंद्र आहेत. त्यातून जमा होणारी माहिती ही मुंबईचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता अत्यंत मर्यादित असते. त्याउलट, पालिकेने ठिकठिकाणी बसविलेल्या १२० स्वयंचलित हवामान केंद्रांतून रोजच तपशीलवार माहिती हवामान विभागाला प्राप्त होते. यात वेगवेगळ्या भागात झालेला पाऊस, तापमान, हवेचा दाब, वा-याची दिशा आणि वेग अशा इत्यंभूत माहितीचा समावेश आहे. ही माहिती हवामान विभागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने ही केंद्र वर्षभर सुरू ठेवावीत, अशी शिफारस या विभागाने महापालिकेकडे केली आहे.
विशेष बाब म्हणजे अशी केंद्र उभारण्यासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्यानुसार मुंबईत आणखी ४० ठिकाणी ही यंत्रणा बसविण्याची गरज आहे. पण उंचच्या उंच इमारतींच्या जाळ्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेली जागा पालिकेला उपलब्ध करून देता येत नाही. सध्या सुरू असलेली केंद्र ही सुद्धा पालिकेच्या शाळा, आरोग्य केंद्र अशा ठिकाणी आहेत, या बाबीकडे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने लक्ष वेधले. मुंबईत मोकळ्या जागेची वानवा असल्याने स्वयंचलित हवामान केंद्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर अशा केंद्रांच्या तारांचा वापर हा स्थानिक रहिवाशांकडून कपडे वाळत टाकण्यासाठी केला जातो, अशी तक्रारही आहे.
२० ठिकाणी एक्यूएम बसविण्याची योजना
मुंबईत हवेचा दर्जा तपासण्यासाठी सध्या केवळ सहा ठिकाणी एक्यूएम (हवेचा दर्जा नियामक) केंद्र कार्यरत आहेत. अशी केंद्र एकूण २० ठिकाणी सुरू करण्याची योजना आहे, असे उच्चस्तरीय अधिका-यांकडून सांगण्यात आले.