भांडुपमध्ये दरडीसह काही घरे ५० फूट खाली कोसळली; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबईतील भांडुपच्या खिंडीपाडा भागात मंगळवारी संध्याकाळी दरडीसह संरक्षक भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.
भांडुपमध्ये दरडीसह काही घरे ५० फूट खाली कोसळली; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Published on

मुंबई : मुंबईतील भांडुपच्या खिंडीपाडा भागात मंगळवारी संध्याकाळी दरडीसह संरक्षक भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. ओमेगा हायस्कूलच्या मागे असलेल्या डोंगरावरून सुमारे ५० फूट उंचीवरून चार घरे संरक्षक भिंतीसह खाली आली. तर बुधवारीही माती खचल्याने दोन घरे मातीबरोबर खाली आली. सुदैवाने ही घरे आधीच रिकामी करण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरड कोसळल्याचा थरार काही स्थानिकांनी कॅमेऱ्यात टिपला असून, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असून, दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिका व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील इतर घरेही सुरक्षिततेच्या दृष्टीने रिकामी केली. दरम्यान, या दुर्घटनेने भांडुपच्या डोंगराळ भागातील धोकादायक झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईत गेल्या तीन चार दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. भांडुप खिंडीपाडा परिसरात मंगळवारी एक मोठी दरड कोसळली. या दरडीसोबत पाच घरे तब्बल ५० फूट खाली कोसळली, तर बुधवारीही माती खचल्याने दोन घरे मातीबरोबर खाली आली.

दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी नसली तरी येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वीच पालिका प्रशासनाने दरडप्रवण भागातील नागरिकांना नोटिशीद्वारे सतर्क केले होते. तसेच, या भागातील अतिधोकादायक घरे पावसाळ्यापूर्वीच खाली करण्यात आली होती. त्यामुळे, येथे मोठी दुर्घटना टळली, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in