जरांगे-पाटलांच्या मुदतीचा शेवटचा दिवस सरकारची डोकेदुखी वाढणार!

राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच धनगर समाजही आरक्षणासाठी आडून बसला आहे
जरांगे-पाटलांच्या मुदतीचा शेवटचा दिवस
सरकारची डोकेदुखी वाढणार!
Published on

मुंबई : मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र मागणी पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या ४० दिवसांपैकी शेवटचा एक दिवस उरला आहे. मराठा समाजाच्या तरुणाने केलेल्या आत्महत्येनंतर धनगर समाजाच्या तरुणाने सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शिंदे, फडणवीस, पवार सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राज्यात जातीय जनगणना करण्याच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी बारामतीत घेराव घातला, तर सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे त्यांना काळे झेंडे दाखविले. दरम्यान खा. सुप्रिया सुळे यांनी आरक्षण या मुद्द्यावर सरकारविरोधी हल्लाबोल केला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. त्यातच मनोज जरांगे-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकार आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आहे. या पार्श्वभूमीवर खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करीत केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही भाजप केवळ कागदी घोडे नाचविण्याचा खेळ करीत आहे, असा घणाघात केला. आता या मुद्यावरून आणखी राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.

राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच धनगर समाजही आरक्षणासाठी आडून बसला आहे. त्यातच ओबीसी समाजाने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको, असे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने जरांग-पाटील यांना ४० दिवसांची मुदत दिली होती, ती मुदतही आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे जरांगे-पाटील आक्रमक झाले असून, त्यांनी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे. त्यातच सकल मराठा समाजानेही राज्य सरकारला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. कारण यासंबंधीचे स्पष्ट संकेतही रविवारी बारामतीत मिळाले. कारण काल रात्री मराठा समाज बांधवांनी थेट बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव घालून आपली नाराजी बोलून दाखविली आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय नेत्यांना ठिकठिकाणी रोखले जाऊ शकते.

या पार्श्वभूमीवर खा. सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. केंद्र आणि राज्यात पूर्ण बहुमतातील सरकार आहे. मात्र, असे असतानाही आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेऊ शकले नाही. त्यामुळेच समाजातून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. यातूनच मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी ३ तरुणांनी आणि जत तालुक्यात धनगर समाजाच्या तरुणाने आत्महत्या केली. एकीकडे भाजपने सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा केला आणि दुसरीकडे आरक्षणाबाबत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला आहे, अशा शब्दांत हल्लाबोल केला.

भाजप दुटप्पी

भाजप महाराष्ट्रात एक आणि केंद्रात भलतीच भूमिका घेत आहे. यांच्या आरक्षणाच्या भूमिकेत एकवाक्यता नाही. त्यामुळेच मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम आदी समुदायांच्या आरक्षणाचे विषय अडकून पडले आहेत, असा आरोप खा. सुप्रिया सुळे यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in