युद्धनौका ‘तारागिरी’चे जलावतरण; माझगाव डॉकमध्ये उभारणी

या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाईन ब्युरोने केले आहे.
युद्धनौका ‘तारागिरी’चे जलावतरण; माझगाव डॉकमध्ये उभारणी

गेल्या आठवड्यात भारतीय नौदलात विमानवाहू विक्रांत युद्धनौका सामील झाल्यानंतर भारतीय नौदलाच्या ताकदीत आता आणखीन वाढ झाली. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे प्रकल्प ‘१७-ए’मधील तिसरी युद्धनौका ‘तारागिरी’चे जलावतरण रविवारी करण्यात आले.

तारगिरी प्रकल्पाची सुरुवात २०२० मध्ये करण्यात आली होती. या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाईन ब्युरोने केले आहे. तर येत्या ऑगस्ट २०२५मध्ये ही विनाशिका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने ‘उदयगिरी’ आणि ‘सूरत’ या युद्धनौकांचे नुकतेच लाँचिंग केले होते. संपूर्ण तारागिरीचे काम हे एकात्मिक बांधकाम पद्धतीने केले जात आहे. त्यात ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३,५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरित करण्यात येणार आहे.

एमडीएलच्या माध्यमातून तपशीलवार डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे वॉरशिप ओव्हरसिईंग टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन गॅस टर्बाइन्स तसेच दोन डिझेल इंजिनच्या माध्यमातून २८ नॉटिकल माईल्सचा वेग गाठणे, या युद्धनौकेला शक्य होणार आहे. यासाठी कार्बनमायक्रो अलॉय स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in