
मुंबई : उच्च न्यायालयाच्या बनावट आदेशाच्या आधारे वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या वकिलाला सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला. २.५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या विनयकुमार खातूला जामीन मंजूर करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. वकिलाची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गंभीर आरोपांमुळे तो जामिनासाठी अपात्र आहे, असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी वकिल विनयकुमार खातूला दिलासा देण्यास नकार दिला.
खातूने यापूर्वी दिल्ली आणि केरळमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असल्याची बनावट ओळख निर्माण केली होती. त्या ओळखीच्या आधारे फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी खातूवर याआधीच दोन गुन्हे दाखल आहेत.