
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. विरोधी पक्षावरही त्याचा परिणाम होणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसकडे जाणार आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच येणार असल्याचा ठाम दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचीही त्याला संमती असल्याचे समजते. त्यामुळे आता काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्यासोबत ९ जण सरकारमध्ये सहभागी झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आतापर्यंत संख्याबळानुसार विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे होते, मात्र आता काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने या पदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसलाच मिळणार, यात शंकाच नाही. याबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बोलून पुढचा निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून यशोमती ठाकूर, सुनील केदार, विजय वडेट्टीवार या नावांची चर्चा आहे.
दरम्यान, काँग्रेसची संख्या जास्त असेल तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.