मुंबई : बीडीडीतील पोलीस वसाहतींची दुरुस्ती, रुग्णालयात पुरेसा औषधसाठा, शासकीय महाविद्यालयांचा विकास शासकीय कार्यालयीन इमारतींची दुरुस्ती, कामगार कल्याण, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, नागरी वस्त्यांची सुधारणा, झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर आणि पुनर्वसन आदी कामे हाती घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने ४९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता लागू होण्याआधी निविदा प्रक्रिया राबवत तातडीने कामे हाती घ्या, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख. शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करून संबंधित सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहन केसरकर यांनी केले. तसेच कार्यालयांत मराठी भाषेत बोलले जावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. शहरातील सर्वात जुन्या इमारतींबाबतचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटत असल्याने रहिवाशांमध्ये दिलाशाचे वातावरण आहे.