मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत ३१ मे रोजी

मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत ३१ मे रोजी

थंडावलेली निवडणूक प्रक्रिया आता वेगवान झाली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३१ मे रोजी वॉर्ड आरक्षणाशी संबंधित लॉटरी काढण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. येत्या मंगळवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरी प्रक्रियेवर कोणालाही सूचना आणि हरकती असल्यास मुंबई महानगरपालिका मुख्यालय तसेच मुंबईतील २४ प्रभागांमध्ये त्या नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. सूचना आणि हरकती मांडण्यासाठी ६ जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतरही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पाहता, मतदान हे ऑक्टोबरमध्ये पार पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता ओबीसी आरक्षणाशिवायच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविकास आघाडी सरकारने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने २३६ नगरसेवकांच्या सदस्यवाढीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. प्रभागरचना जाहीर झाल्याने आता आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात मंगळवारी म्हणजे ३१ मे रोजी पार पडेल. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in