आता पुढील स्थानक चर्नी रोड नव्हे गिरगाव, करी रोड नव्हे लालबाग; मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर

मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावरील ७ स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला.
आता पुढील स्थानक चर्नी रोड नव्हे गिरगाव, करी रोड नव्हे लालबाग; मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर
PTI
Published on

मुंबई : मुंबईकरांची ‘लाइफलाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांची ओळख आता मराठी नावाने होणार आहे. आता पुढील स्थानक चर्नी रोड नव्हे ‘गिरगाव’ व करी रोड नव्हे ‘लालबाग’ अशा उद्घोषणा प्रवाशांच्या कानी पडणार आहेत. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावरील ७ स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांना आजही ब्रिटिशकालीन नावे आहेत. मुंबई मराठी माणसाची, त्यामुळे स्थानकांची नावे मराठीत असावी, अशी मागणी मुंबईकरांकडून सतत होत होती. मुंबईकरांच्या मागणीचा विचार करत राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत या ठरावाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. पारतंत्र्याच्या खुणा पुसून महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता टिकवणे, मराठी संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येतील, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.अखेर मंगळवारी विधान परिषदेत मंत्री दादा भुसे यांनी सात स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मांडला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो ठराव सभागृहात मांडला असता एकमताने मंजूर करण्यात आला. विधानसभेच्या माध्यमातून हा ठराव आता केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर सात स्थानकांची नावे बदलण्याबाबत अंमलबजावणी सुरू होईल.

या स्थानकांची होणार मराठी ओळख

  • करी रोड - लालबाग

  • सँडहर्स्ट रोड - डोंगरी

  • मरिन लाइन्स - मुंबादेवी

  • चर्नी रोड - गिरगाव

  • कॉटन ग्रीन - काळाचौकी

  • डॉकयार्ड - माझगाव

  • किंग्ज सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ

नावे बदलली, इतिहास सांगा - जितेंद्र आव्हाड

रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास पाठिंबा आहे, परंतु रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येत असताना त्या-त्या स्थानकाचा इतिहास सांगा, असा टोला विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी दादा भुसे यांना लगावला.

logo
marathi.freepressjournal.in