

मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांची विधवा पत्नी असल्याचा बनाव करुन पेन्शन लाटली, असा आरोप असलेल्या महिलेला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. आदिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांनी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लेखा पाठक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. डॉ. लेखा पाठक यांनी आदिक यांची विधवा म्हणून पेन्शन मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवल्याचाही आरोप आहे.
पोलिसांकडून अटक होण्याच्या शक्यतेने डॉ. लेखा पाठक यांनी ५ मे रोजी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचा अर्ज मंजूर करताना न्यायालयाने मरीन ड्राइव्ह पोलिसांना डॉ. पाठक यांना अटक न करण्याचे निर्देश दिले.
पृथ्वीराज यांच्या तक्रारीनंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे खटला सुरू झाला. डॉ. पाठक यांनी बनावट कागदपत्रे सादर केली. ऑगस्ट २००७ मध्ये आदिक यांच्या निधनानंतर डॉ. पाठक यांनी विधवा म्हणून पेन्शन मिळवली. डॉ. पाठक आदिक यांचा विवाह झाला नव्हता, असा दावा पृथ्वीराज यांनी केला. आदिक व त्यांची पहिली पत्नी शोभा यांनी घटस्फोटाच्या करारावर स्वाक्षरी केली होती, असा दावा करण्यात आला.