मुंबई विद्यापीठात देणार पर्शियातील प्राचीन संस्कृतीचे धडे, एक आठवड्याचा अल्पकालीन अभ्यासक्रम

वैश्विक संस्कृती, भाषा, सभ्यता आणि परंपरांच्या अध्ययन आणि संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे
Mumbai University
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : वैश्विक संस्कृती, भाषा, सभ्यता आणि परंपरांच्या अध्ययन आणि संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मुंबई विद्यापीठात जागतिक संस्कृती आणि सभ्यता यावर विद्यापीठातील शिक्षकांसाठी अल्पकालीन अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. एका आठवड्याच्या कालावधीच्या या अल्पकालीन अभ्यासक्रमांत लिथुआनिया, स्लोव्हाकिया, रुमानिया आणि प्राचीन पर्शियातील प्राचीन संस्कृती आणि सभ्यतांचा अभ्यास केला जाणार आहे.

मुंबई विद्यापीठातील यूजीसी-मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटर, पुरातत्त्व विभाग, हिंदू अध्ययन केंद्र आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात या अभ्यासक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लिथुआनियाच्या राजदूत डायना मिकविसेनी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, मुख्य वक्ते म्हणून लाभलेले इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजचे संचालक विजय स्वामी, पुरातत्त्व विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश मसराम, हिंदू अध्ययन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. रविकांत सांगुर्डे, यूजीसी-मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटरच्या प्रभारी संचालिका प्रा. विद्या व्यंकटेशन यांच्यासह देशभरातून या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेले शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी लिथुआनियाच्या राजदूत डायना मिकविसेनी यांनी लिथुआनिया आणि संस्कृत भाषेतील साम्य आणि प्राचीन परंपरांवर प्रकाश टाकला. दोन्ही भाषेतील अनेक शब्दांत साम्य आढळत असल्याचे त्यांनी काही शब्दांचे उदाहरण देऊन सांगितले. तर इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजचे संचालक विजय स्वामी यांनी जगाच्या पटलावरील सांस्कृतिक विविधता, युरोपियन देश आणि पाश्चिमात्य देशातील प्राचीन आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा यावर प्रकाश टाकला.

वैश्विक संस्कृती, भाषा, सभ्यता आणि परंपरांचे अध्ययन आणि संशोधनातून अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा होणार असून याचा अभ्यास करणे ही काळाची गरज बनली आहे. प्राचीन संस्कृतींची जाणीव करून देण्यासाठी आणि मानवी संस्कृतीचे उत्तम आकलन होण्यासाठी या अल्पकालीन अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. वैश्विक प्राचीन भाषेचे जतन आणि संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठात सेंटर फॉर अवेस्ता पहलवी स्टडीची स्थापना करण्यात आली असून झोरास्ट्रीयन संस्कृतीचा अभ्यास यामाध्यमातून केला जाणार आहे.

- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

logo
marathi.freepressjournal.in