रेसकोर्सच्या भवितव्याचा निर्णय मुंबईकरांना घेऊ दे! भाजपच्या माजी नगरसेवकाचे आयुक्तांना पत्र

कोट्यवधी रुपयांचा भूखंड असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या भवितव्याचा निर्णय मुंबईकरांना घेऊ दे, अशी मागणी करणारे पत्र ...
रेसकोर्सच्या भवितव्याचा निर्णय मुंबईकरांना घेऊ दे! भाजपच्या माजी नगरसेवकाचे आयुक्तांना पत्र

मुंबई : कोट्यवधी रुपयांचा भूखंड असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या भवितव्याचा निर्णय मुंबईकरांना घेऊ दे, अशी मागणी करणारे पत्र पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांना दिल्याचे भाजपचे कुलाब्यातील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले. दरम्यान, रेसकोर्सच्या प्रस्तावित पुनर्विकासासाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) ५०० सदस्यांची मान्यता पुरेशी नाही. ही जमीन मुंबईकरांची असून, त्यांची मते सर्वात महत्त्वाची आहेत, असेही नार्वेकर यांनी पत्रात म्हटले आहे.

रेसकोर्स जमीनप्रश्नी उच्चाधिकार समिती (एचपीसी) स्थापन करण्याची मागणी नार्वेकर यांनी केली आहे. ही समिती सर्व संबंधितांची मते विचारात घेऊ शकेल. शहरासाठी रेसकोर्सच्या जमिनीचे महत्त्व पाहता आता या मुद्द्यावर कोणतेही पुढील पाऊल टाकण्यापूर्वी विचार केला पाहिजे. पालिका आयुक्तांना रेसकोर्सवर सेंट्रल पार्क उभारणे ही शहराची गरज वाटत असेल तर या महत्त्वाकांक्षी योजनेला पुढे घेऊन जाण्यापूर्वी सार्वमत घ्यावे, अशी माझी मागणी आहे. पालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांचा आवाज दाबला जाऊ नये. या प्रस्तावावर नागरिकांची मते न आजमावता पुढे जाण्याची हालचाल म्हणजे दुसरे काही नसून नागरिकांचा विश्वासघात असेच म्हणावे लागेल, असे नार्वेकर म्हणाले.

रेसकोर्स आराखड्यावर सार्वमत घेण्याच्या मागणीवर पालिकेने कार्यवाही न केल्यास हा मुद्दा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन जाऊ. पुनर्विकास आणि सेंट्रल पार्क निर्मितीच्या नावाखाली मुंबईतील इतका महत्त्वाचा आणि सर्वात मोठा जमिनीचा तुकडा असा सहजी हातातून जाऊ देणार नाही. ही मोकळी जागा वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आरडब्ल्यूआयटीसीच्या ५०० सदस्यांनी प्रस्तावित पुनर्विकासाच्या बाजूने मतदान केले असेल, तरीही ते एकमेव यासंबंधी निर्णय घेऊ शकत नाहीत. जमिनीचे मालक असलेल्या मुंबईतील नागरिकांची मते या मुद्द्यावर घेण्यात आलेली नाहीत. त्यांची मते का जाणून घेतली जात नाहीत, असा सवाल करत या जमिनीसंदर्भात कोणताही निर्णय एकतर्फी घेतला जाऊ शकत नाही, असे नार्वेकर यांनी सांगितले.

१२० एकर जमीन १७५ एकर बागेत विलीन करणार?

पालिकेने या विषयावर मुंबईकरांशी कोणतीही सल्लामसलत केलेली नाही. या विषयात पारदर्शकता खूप आवश्यक आहे. त्यासाठी सेंट्रल पार्क विकसित करण्याच्या योजनेला आपण विरोध करत आहोत. आरडब्ल्यूआयटीसीची १२० एकर जमीन घेऊन ती सागरीकिनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) १७५ एकर बागेत विलीन करून हे 'मुंबई सेंट्रल पार्क' करण्याचे प्रस्तावित आहे, असा दावा नार्वेकर यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in