स्वच्छता अभियानात मुंबईला अव्वल स्थानी आणूया -मुख्यमंत्री

आगामी काळात स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
स्वच्छता अभियानात मुंबईला अव्वल स्थानी आणूया -मुख्यमंत्री

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून संपूर्ण जगाला मुंबईबद्दल आकर्षण आहे. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने देशभरात अव्वल स्थान पटकावले आहे. आगामी काळात स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

‘डीप क्लिन ड्राईव्ह’ला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिसर स्वच्छतेबाबत मुंबईकरांमध्ये जनजागृती होत आहे. ही मोहीम मुंबईच्या प्रत्येक गल्ली आणि रस्त्यापर्यंत पोहोचायला हवी. प्रत्येक रस्ता, गल्लीसह सार्वजनिक प्रसाधनगृहे नियमितपणे स्वच्छ व्हायला हवी. या मोहिमेचा परिणाम मुंबईच्या अंतर्गत भागात दिसायला हवा. यासाठी लागणारे मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची गरज भागविण्यासाठी गरज भासल्यास बाहेरील खासगी संस्थांची मदत घ्यावी. स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे, हरीतपट्टे तयार करणे, सुशोभीकरण याकडे लक्ष द्यावे. यासाठी तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील ठिकाणांची निवड करून त्यांच्यावर सुशोभीकरणाची जबाबदारी सोपवावी. महानगरपालिकेची रुग्णालये, समुद्रकिनारे, मंडई, शाळांचे परिसर यांच्याही स्वच्छतेकडे लक्ष द्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

रस्त्याच्या कडेला दुतर्फा उभ्या असणाऱ्या वाहनांना हटवून त्याठिकाणी स्वच्छता करण्यासाठी पालिकेने पोलिसांची मदत घ्यावी. सखोल स्वच्छता मोहीम सुरू झाल्यापासून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईच्या बदलासाठी ही चांगली सुरुवात आहे. या मोहिमेत स्वच्छता कर्मचारी उत्साहाने योगदान देत आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सर्व ४६ वसाहतींच्या विकासाची कामे तातडीने सुरू करावीत, असेही ते म्हणाले.

मुंबईत सुरू असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचा (डीप क्लिन ड्राईव्ह) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार राम कदम, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासूंसह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्तांनी फिल्डवर उतरा!

स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई पालिकेच्या प्रत्येक वार्डातील सहाय्यक आयुक्तांनी थेट ‘फिल्डवर’ उतरून काम करावे. वार्डांमध्ये स्पर्धा ठेवून चांगले काम करणाऱ्या वॉर्डांना गौरविण्यात यावे. मोहिमेत जास्तीत जास्त चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in