मुंबई : पालिका रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दुकानातून औषधे खरेदी करावी लागू नयेत, या हेतूने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या झिरो प्रिस्क्रीप्शन योजनेसाठीची इरादा पत्रे कोणत्याही परिस्थितीत येत्या महिनाभरात, १५ सप्टेंबरपर्यंत जारी करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.
या योजनेची निविदा प्रक्रिया मोहीम पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. तसे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मध्यवर्ती खरेदी खात्याला दिले आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ आणि अतिरिक्त संगणकांच्या माध्यमातून निविदा पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना आवश्यक असणारी औषधे बाहेरील औषध दुकानांमधून खरेदी करावी लागू नयेत, यासाठी झिरो प्रिस्कीप्शन धोरण राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या स्तरावर सर्वंकष निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही संबंधित खात्यांद्वारे सुरू आहे. तथापि, ही प्रक्रिया अधिक वेगाने पार पडावी, या उद्देशाने अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. योजनेतील औषध खरेदीशी संबंधित निविदा प्रक्रियेतील पडताळणी प्रक्रिया वेगाने पार पडावी, यासाठी आवश्यक ते अतिरिक्त मनुष्यबळ आणि अतिरिक्त संगणकांचा पुरवठा संबंधित खात्याला तातडीने करावा. योजनेची कार्यवाही मोहीम स्वरूपात व दैनंदिन आढावा घेऊन येत्या ६ सप्टेंबरपर्यंत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. १५ सप्टेंबरपर्यंत 'लेटर ऑफ इन्टेंट' म्हणजे इरादा पत्रे कोणत्याही परिस्थितीत देण्यात यावेत, असे सक्त निर्देश बांगर यांनी मध्यवर्ती खरेदी खात्यासह रुग्णालय प्रशासनास दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत मोफत औषधे उपलब्ध होणार आहेत. यासाठी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेत विविध सूचीअंतर्गत विविध औषधे व वैद्यकीय बाबींची पडताळणी प्रक्रिया सध्या मध्यवर्ती खरेदी खाते आणि बा.य.ल. नायर रूग्णालय यांच्यामार्फत सुरू आहे. ही प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी आवश्यक असणारे वरिष्ठ फार्मासिस्ट, फार्मासिस्ट आणि डेटा एंट्री ऑपरेटर आदी अतिरिक्त मनुष्यबळ व या अतिरिक्त मनुष्यबळाला आवश्यक असणारे अतिरिक्त संगणक देखील तातडीने म्हणजे पुढच्याच दोन दिवसात उपलब्ध करून देण्याचे आदेश बांगर यांनी बैठकीदरम्यान सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) विजय बालमवार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे यांना दिले आहेत.
तीन आठवड्यांची मुदत
अतिरिक्त मनुष्यबळाने सोमवार ते शनिवार दरम्यान मोहीम पद्धतीने त्यांना नेमून दिलेले काम पूर्ण करावयाचे आहे. हे काम करण्यासाठी कामाच्या प्रकारानुसार चमू तयार करून त्यांच्याद्वारे हे काम करवून घ्यावयाचे आहे. तसेच चमू प्रमुख व विभाग प्रमुख यांनी सर्व चमूंद्वारे करण्यात येणाऱ्या कामांचा दररोज आढावा घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या सर्व कार्यवाहीसाठी तीन आठवड्यांची मुदत अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.
चार रुग्णालयांत लवकरच एमआरआय मशीन
महानगरपालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये एमआरआय मशीन खरेदीची निविदा प्रक्रिया आता महत्त्वाच्या टप्प्यात व ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. याबाबत देखील सविस्तर चर्चा बैठकीदरम्यान करण्यात आली. या निविदा प्रक्रियेला अधिक प्रतिसाद मिळावा व एकंदरीत मशीन खरेदीची प्रक्रिया त्वरित पूर्ण व्हावी, यादृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.