मुंबई : मुंबईतील उद्यानांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मालाड मनोरी कोळीवाडा येथील पाच घर उद्यानांत वाचनालय, गजेबो लहानग्यांना खेळण्याची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी पालिका सवा दोन कोटी रुपये खर्चणार आहे.
महापालिकेच्या पी उत्तर विभागातील मनोरी परिसरातील कोळी बांधवांच्या मागणीनुसार स्थानिक आमदार सुनील राणे यांनी महापालिकेसोबत पत्रव्यवहार करत या उद्यानाचे नुतनीकरण करण्याची शिफारस केली होती. मनोरी कोळीवाड्यातील रहिवाशांना मोकळ्या सार्वजनिक जागाच उपलब्ध नसल्याने महापालिकेने मनोरी गाव येथील पाच घर उद्यानाचे नुतनीकरण व विकासाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिका आयुक्तांच्या मान्यतेनुसार या ठिकाणी चालण्याची मार्गिका गजेबो, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, वाचनालय, टॉयलेटची डागडुजी, संरक्षक भितीची डागडुजी आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये यश ऋषभ ब्रदर्स या कंपनीची निवड झाली असून या कामांसाठी सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पुढील चार महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.