प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; लखन भैया बनावट एन्काऊंटरप्रकरणी दोषी

लखन भैया बनावट चकमकप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने १३ जुलै २०१३ मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी याच्यासह १३ पोलीस व अन्य आठ आरोपी मिळून २१ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; लखन भैया बनावट एन्काऊंटरप्रकरणी दोषी

मुंबई : चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना लखन भैया बनावट चकमकप्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत मुंबई हायकोर्टाने शर्मा यांना दोषी ठरवले आणि इतर दोषींप्रमाणेच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच सत्र न्यायालयाने वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशीसह १३ पोलिसांना ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले, तर सहा जणांची निर्दोष मुक्तता केली.

लखन भैया बनावट चकमकप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने १३ जुलै २०१३ मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी याच्यासह १३ पोलीस व अन्य आठ आरोपी मिळून २१ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तर वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना निर्दोष मुक्त केले होते. प्रदीप शर्मा यांना निर्दोष मुक्त करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात फिर्यादींनी तसेच राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलांवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर ३ जुलै २०२३ ला सुनावणीला प्रारंभ झाला. चार महिने नियमित सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने ८ नोव्हेंबरला राखून ठेवलेला निर्णय मंगळवारी जाहीर केला.

खंडपीठाने हा निर्णय देताना सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच तीन आठवड्यात न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश दिले. तर दोषी ठरविलेल्या अन्य १३ आरोपींमध्ये सहा पोलीस अधिकारी आणि सात अंमलदारासह अन्य आरोपींचे अपील फेटाळून लावताना ६ आरोपींना दिलासा देत या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. तर एक पोलीस अधिकारी आणि एक अन्य अशा दोन आरोपींचा खटला सुरू असताना मृत्यू झाला.

प्रदीप शर्माची वादग्रस्त कारकीर्द

एकेकाळी अंडरवर्ल्डमधील गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख असणारे एन्काऊंटरफेम प्रदीप शर्मां १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झाले. १९९६ नंतर त्यांनी केलेल्या एन्काऊंटरमुळे त्यांची पोलीस दलातील कारकीर्द वादग्रस्त ठरली. लखन भैया बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध प्रकरणात २००८ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्बप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेत नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवली. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तुरुंगवास भोगत असताना ऑगस्ट २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

१३ आरोपींची नावे

१) पोलिस निरीक्षक प्रदीप पांडुरंग सूर्यवंशी, २) रत्नाकर गौतम कांबळे, ३) हितेश शांतीलाल सोलंकी, ४) विनायक बाबासाहेब शिंदे, ५) तानाजी भाऊसाहेब देसाई, ६) नितीन गोरखनाथ सरतापे, ७) देविदास गंगाराम हरी सकपाळ, ८) प्रकाश गणपत कदम, ९) दिलीप सीताराम पालांडे, १०) गणेश अंकुश हारपुडे, ११) आनंद बालाजी पाताडे, १२) पांडुरंग गणपत कोकम, १३) संदीप हेमराज सरदार.

निधन झालेल्या आरोपींची नावे

१) जनार्दन तुकाराम भानागे, २) अरविंद अर्जुन सरवणकर.

निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या आरोपींची नावे

१) शैलेंद्र धूपनारायण पांडे उर्फ पिंकी, २) अखिल शिरीन खान उर्फ बॉबी, ३) मनोज मोहन राज, ४) सुनील रमेश सोळंकी, ५) मोहम्मद शेख मोहम्मद ताका मोइद्दीन शेख, ६) सुरेश मंजुनाथ शेट्टी.

  • अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार असल्याच्या संशयावरून लखनभैयासह त्याचा साथीदार अनिल भेडा याला नोव्हेंबर २००६ मध्ये प्रदीप शर्मा यांच्या पथकाने वाशी येथून उचलले होते. त्यानंतर वर्सोवा येथील नाना-नानी पार्कजवळ लखनभैयाचे एन्काऊंटर करण्यात आले. या घटनेनंतर लखनभैयाच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. सत्र न्यायालयाने १३ जुलै २०१३ रोजी या खटल्यातून वरिष्ठ अधिकारी प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करताना अन्य २१ आरोपींना दोषी धरत सर्वांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

  • लखनभैयाचे एन्काऊंटर हा प्रत्यक्षात अत्यंत शांत डोक्याने करण्यात आलेला खून आहे, असा आरोप करत लखनभैयाच्या बंधूने न्यायालयाचे दरवाजा ठोठावले. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले होते. दंडाधिकारी चौकशीत लखनभैयावर अत्यंत जवळून मारण्याच्या हेतूनेच गोळीबार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर २००९ साली न्यायालयाने एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. एसआयटीने तत्काळ कारवाई करून २०१० मध्ये प्रदीप शर्मा, प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह १४ पोलिसांना अटक केली. लखनभैयाची हत्या जनार्दन भणगे या त्याच्याच पार्टनरने सुपारी देऊन घडवून आणल्याचे एसआयटीच्या चौकशीत नंतर उघड झाले. लखनभैयाच्या हत्येचा प्रमुख साक्षीदार असलेला अनिल भेडा न्यायालयात साक्ष देण्याआधी अचानक बेपत्ता झाला. महिन्याभरानंतर त्याचा मृतदेह सापडल्याने प्रकरणाचा पेच आणखीच वाढला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in