रेल्वे परिसरातील नाल्यातून काढलेला गाळ, राडारोडा उचला; रेल्वे प्रशासनाला पालिकेच्या सूचना

रेल्वे परिसरातील नाल्यातून काढलेला गाळ, राडारोडा उचला; रेल्वे प्रशासनाला पालिकेच्या सूचना

पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पालिकेच्या वतीने परिमंडळ १ अंतर्गत येणारी मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके तसेच परिसर आणि विभाग कार्यालयातील तयारीची पाहणी शनिवारी करण्यात आली.

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरात नाल्यातून काढलेला गाळ, कचरा, राडारोडा उचलण्याच्या तत्काळ उचला तसेच आपत्कालीन कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना पालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत.

पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पालिकेच्या वतीने परिमंडळ १ अंतर्गत येणारी मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके तसेच परिसर आणि विभाग कार्यालयातील तयारीची पाहणी शनिवारी करण्यात आली. पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी पावसाळ्यात संभाव्य आव्हानांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने उपाय करण्याच्या दृष्टीने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत रेल्वे प्रशासनातर्फे पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, चर्नी रोड व ग्रँट रोड तसेच मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांबाबत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यांचा निपटारा शनिवारी डॉ. हसनाळे यांनी केला.

सँडहर्स्ट रोड स्थानकाची पाहणी

बी विभागातील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक येथील स्थळ पाहणी दरम्यान बी विभागाचे सहाय्यक आयुक्त उद्धव चंदनशिवे, सँडहर्स्ट रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक विनायक शेवाळे तसेच बी विभागातील विविध खाते प्रमुख उपस्थित होते. सँडहर्स्ट रोड रेल्वे रुळालगत असलेल्या इमारतीची पाहणी करून पावसाळ्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करावेत, अशा सूचना डॉ. हसनाळे यांनी दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in