लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन..! मुलांसाठी अभिनयाचे क्लासेस ;महाराष्ट्रातील पहिले बालरंगभूमी नाट्यगृह मुंबईत

लहान मुलांच्या नाटकांसह चित्रपटविषयक विविध उपक्रम होणार आहेत
लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन..! मुलांसाठी अभिनयाचे क्लासेस ;महाराष्ट्रातील पहिले बालरंगभूमी नाट्यगृह मुंबईत

मुंबई : वांद्रे येथील कार्टर रोडवरील शेरली राजन गावात चिल्ड्रन्स थिएटर आरक्षित इमारत असून या इमारतीत लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स थिएटर सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या ठिकाणी लहान मुलांना चित्रपटाचे प्रशिक्षण, चित्रपट दाखवणे, मास्टर क्लासेस असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुंबईत बालरंगभूमी उपलब्ध व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी ज्या संस्था या क्षेत्रात कार्यरत आहेत, अशा संस्थांकडून अर्ज मागवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त (मालमत्ता) प्रशांत गायकवाड यांनी दिली.

मोठ्यांसाठी मुंबईत अनेक नाट्यगृह आहेत. मात्र लहान मुलांच्या नाटकांचे प्रयोग करायचे झाल्यास ते मोठ्यांच्याच नाट्यगृहात करावे लागतात. बालरंगभूमीसाठी स्वतंत्र नाट्यगृह असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मुंबई महापालिकेने कलावंतांचे हे स्वप्न पूर्ण केले असून वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोड भागात नवीन नाट्यगृह आरक्षित इमारतीत सुरू करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या नाटकांसह चित्रपटविषयक विविध उपक्रम येथे होणार आहेत.

कार्टर रोडवरील शेरली राजन गावात नगर भूमापन क्रमांक ११६६ ते ११६९ आणि ११७९ वर ‘चिल्ड्रन थिएटर’करिता आरक्षित भूखंडावर पालिकेने ७१२.६३ चौरस मीटर जागेत नाट्यगृह उभारले आहे. हे नाट्यगृह चालविण्यासाठी संस्थांना पुढे येण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अर्ज करणारी संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात संस्था नोंदणी अधिनियम तसेच मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० या दोन्ही अधिनियमानुसार मागील ५ वर्षापासून अथवा कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत असावी. संस्थेची मागील तीन वर्षाच्या कालावधीतील किमान वार्षिक उलाढाल दहा लाख रुपये असावी. ही उलाढाल आर्थिक वर्षांच्या प्रस्तावित खर्चाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी नसावी. मागील तीन वर्षांच्या कालावधीकरिता सनदी लेखापालांनी प्रमाणित केलेला ताळेबंद अर्जासोबत सादर करावा लागेल. संस्थेच्या नावे स्वतंत्र पॅनक्रमांक असावा, यासह विविध अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत.

नाट्यगृहाचा वापर यासाठी

चित्रपट प्रदर्शन

मास्टर क्लासेस

चित्रपट कार्यशाळा

बूट शिबिरे

मुले व प्रौढांसाठी विशेष कार्यक्रम

बालरंगभूमी

अटी व शर्तींची पूर्तता बंधनकारक!

* अर्जदार संस्थेचा या क्षेत्रातील कमीतकमी तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. त्यासंदर्भात कागदोपत्री पुरावे सादर करावे लागतील.

* संस्था आयकर प्रपत्र सादर करणारी असावी. मागील ३ वर्षाचे आयकर विवरणपत्र सादर करावे लागेल.

* पात्र संस्थेस प्रथमत: ११ महिन्यांकरिता व अनुमती तत्त्वावर ५ रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना या दराने अनुज्ञप्ती शुल्काचा भरणा करावा लागेल.

* संस्थेस दोन वर्षांच्या अनुज्ञप्ती शुल्काइतकी रक्कम व्याजविरहीत सुरक्षा ठेव म्हणून पालिकेकडे जमा करावी लागेल.

या गोष्टींची पूर्तता, तरच प्राधान्य!

* संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषिक चित्रपट, बालरंगभूमीसाठी काम करत असल्यास प्राधान्य.

* संस्था विभाग, परिमंडळ, मुंबई शहर व उपनगरातील असल्यास प्राधान्य.

* संस्थेकडे पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक.

* चित्रपट, अभिनय, बालरंगभूमी क्षेत्रात राबविलेल्या कार्यक्रमांचा तपशील

* संस्थेस प्राप्त गुणगौरव/प्रमाणपत्रे/पारितोषिके या संदर्भातील कागदोपत्री पुरावे

* संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा तपशील व त्याचे लाभार्थी

* संस्थेकडून शिक्षित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विविध क्षेत्रातील नैपुण्य/कौशल्य प्राप्त केल्यासंदर्भातील कागदपत्रे.

logo
marathi.freepressjournal.in