मुंबई : गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव मंडळांकडून नाममात्र १०० रुपये अनामत रक्कम आकारण्यात येणार आहे. अन्य परवानग्या मोफत देण्यात येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार व नवरात्रौत्सव मंडळांची बैठक पालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ते बोलत होते.
मुंबई शहरात पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस-पवार महायुती सरकारच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळांची संयुक्त बैठक बुधवारी पालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करावे, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्र मंडळे दरवर्षी अधिकृतरित्या परवानगी घेतात. तसेच मुंबई शहरात ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. भाजप मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई शहराच्या १५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच हिंदू सणाबाबत तातडीने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळांनी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
या बैठकीत मुंबई भाजप उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, कमलेश यादव, विद्यार्थी सिंह, शीतल गंभीर देसाई, दक्षा पटेल, प्रियांका मोरे, हरीश भांदिर्गे, सेजल देसाई तसेच मुंबई प्रवक्ता निरंजन शेट्टी आदी उपस्थित होते.
नवरात्रौत्सव मंडळांना दिलासा!
गणेश उत्सवाच्या धर्तीवरच एक खिडकी योजनेमार्फत परवानग्या देण्यात येतील.
बिगर व्यावसायिक नवरात्री मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ केले जाईल. नाममात्र अनामत रक्कम रु. १००/- आकारण्यात येईल.
नवरात्रीत दसऱ्याला मूर्ती विसर्जन, गरबा विसर्जन यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाशझोत दिवे, शौचालय, धूम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था गणेश विसर्जनाच्या धर्तीवर महापालिका प्रशासकीय विभागातर्फे उभारण्यात येईल. तसेच पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेची तसेच दागिन्यांच्या चोऱ्या होऊ नयेत म्हणून पुरेसा बंदोबस्त ठेऊन काळजी घेण्यात येईल. वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्था याकडे विशेष लक्ष वाहतूक पोलीस देतील.
छट पूजेसाठी कृत्रिम तलाव
छट पूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था, , प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष अशी सर्व व्यवस्था प्रशासकीय विभागातर्फे करण्यात येईल. छट पूजेसाठी १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तसेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे सूर्योदयाच्यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल.