थर्टीफर्स्ट साजरा करणाऱ्या तळीरामांसाठी गुड न्यूज! वाईन शॉप आणि बार 'इतक्या' वाजेपर्यंत सुरू राहणार

राज्य सरकारने थर्टीफर्स्ट साजरा करणाऱ्या तळीरामांसाठी गुड न्यूज दिली आहे.
थर्टीफर्स्ट साजरा करणाऱ्या तळीरामांसाठी गुड न्यूज! वाईन शॉप आणि बार 'इतक्या' वाजेपर्यंत सुरू राहणार

प्रतिनिधी/मुंबई : राज्य सरकारने थर्टीफर्स्ट साजरा करणाऱ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे. मुंबईत वाईन शॉप मध्यरात्री १ वाजेपर्यंत तर बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. वेळेतील ही शिथिलता फक्त ३१ डिसेंबरसाठीच असणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता ३१ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच वाईन शॉप १ वाजेपर्यंत उघडे राहणार आहेत. वाईन शॉपसोबतच बिअरबार, परमिटरूमना देखील वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरच्या रात्री बार हे पहाटे पाच वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी मिळाली आहे.

तसेच क्लब अनुज्ञप्ती व परवाना कक्ष यांना पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री साडेअकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत शिथिलता असेल. सीएल-३ अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे. ही वेळेची शिथिलता ३१ डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in