ठाकरे, शिवसेनेचं नाव न वापरता जगून दाखवा ; उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान

तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा; पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजवलेली मुळे आहेत, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेले, ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे.
ठाकरे, शिवसेनेचं नाव न वापरता जगून दाखवा ; उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान
Published on

काहीजण म्हणत होते की मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले आहेत. ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, असे थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे. मला या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही. तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

फेसबुक लाईव्हच्या माध्मयातून जनतेशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. शिवसेनाभवन येथे शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. हा भाजपचा डाव असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मी वर्षा निवासस्थान सोडले म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन, असा कधी विचार केला नव्हता. त्या पदाचा कधीच मोह मला नव्हता. आधी दोन वर्षे कोरोना होता. त्यानंतर मानेचे दुखणे लागले. पहिले ऑपरेशन झाले तेव्हा सगळे ठिक होते; पण एक दिवशी अचानक शरिराच्या काही भागांच्या हालचाली होत नसल्याचे दिसून आले. मग दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळीच विरोधकांनी डाव साधला. आदित्य ठाकरे त्यावेळी परदेशात होते. एकनाथ शिंदेंसोबत काही आमदार गुजरातला गेल्यानंतर काही आमदारांना बोलाविण्यात आले होते. यावेळी काही झाले तरी सोडणार नाही, असे ते म्हणाले. दादा भुसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचे करायचे काय, अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली.

‘‘तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा; पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजवलेली मुळे आहेत, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेले, ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ‘‘जो कोणी समोर येईल, त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे, असे समजा असे आवाहनही त्यांनी केले. तुम्हाला जिथे भवितव्य दिसत असेल तिथे खुशाल जा, मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी आनंदाने हे पद सोडायला तयार असल्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरे यांनी केला.

मग माझ्या मुलाने काहीच करायचे नाही का?

ज्यांना आपण मोठे केले, त्यांची स्वप्ने मोठी झाली. ती मी पूर्ण करू शकत नाही. त्यांनी जावे. आपण प्रत्येकवेळी यांना महत्वाची खाती दिली. नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असते; पण ते मी यांना दिले. माझ्याकडे साधीच खाती ठेवली. आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि मी बडवा होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे. यांच्या मुलाला खासदार केले; मग माझ्या मुलाने काहीच करायचे नाही का, अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली.

कुटुंबावर घाणेरडे आरोप करणाऱ्यांसोबत जाणार नाही

‘‘भाजपसोबत जावे, यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी कधीच बसणार नाही. मी शांत आहे; पण षंढ नाही, असेही ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in