मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी ड्राय डे जाहीर करण्याचा मुंबई जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी फैसला होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठाने शुक्रवारी २४ मे रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० मे रोजी मुंबई शहर आणि उपनगरात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ४ जूनला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी संपूर्ण दिवस दारूबंदीचा आदेश जारी केला आहे. या निर्णयाविरोधात आहार संघटनेने उच्च न्यायालयात अॅड. वीणा थडानी, अॅड. विशाल थडानी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
अॅड. विणा थडानी यांनी ही याचिका सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बेकायदेशीर दारूविक्री मोठ्या प्रमाणात होण्याची भीती व्यक्त केली. तसेच निवडणुकीचा निकाल दुपारनंतर जाहीर होणार असून दिवसभर दारूबंदीमुळे दारू विक्रेत्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा आदेश रद्द करावा, अशी विनंती केली. खंडपीठाने याची दखल घेत सुनावणी २४ मे रोजी निश्चितत केली.