पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह लिखाणामुळे लोकलच रद्द; दादरला प्रवाशांचे हाल

लोकल अचानक रद्द केल्याने प्रवाशांचा संताप झाला. तसेच त्यांचा खोळंबाही झाला.
पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह लिखाणामुळे लोकलच रद्द; दादरला प्रवाशांचे हाल
ANI
Published on

कमल मिश्रा/मुंबई : अंबरनाथ-सीएसएमटी लोकल मंगळवारी दादर रेल्वे स्थानकात अचानक रद्द केल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप भोगावा लागला. रेल्वेने ‘तांत्रिक’ कारणास्तव लोकल रद्द केली असल्याचे जाहीर केले असले, तरी त्याचे खरे कारण आता बाहेर आले. कोणा अज्ञात व्यक्तीने पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह लिखाण केले होते. हे एका प्रवाशाने पाहिले. त्याने तत्काळ रेल्वे नियंत्रण कक्षाला फोन करून याची माहिती दिली. रेल्वे प्रशासनाने ताबडतोब सूत्रे हलवली. ही लोकल दादर रेल्वे स्थानकात पोहचल्यानंतर रद्द करण्यात आली. लोकल अचानक रद्द केल्याने प्रवाशांचा संताप झाला. तसेच त्यांचा खोळंबाही झाला.

अंबरनाथहून ही लोकल २.४५ वाजता सुटून ती ४.०९ वाजता सीएसएमटीला पोहचते. मात्र, दुपारी ३.५० वाजता ती दादरलाच रद्द करण्यात आली. या लिखाणात अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. हे लिखाण काळ्या पेनने केले होते. ही बाब लक्षात येताच लोकल दादरला रद्द केली. त्यानंतर ही लोकल कळवा कारशेडला धुण्यासाठी नेण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in