
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदी प्रकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणी १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्थानिक मराठी नागरिक घटनास्थळी जमणार आहेत. यावेळी पोलिसांना धक्काबुक्की करणारे, चाकू-सुरी आणणारे, कोर्टाचा अवमान करणारे अजूनही मोकाट का फिरत आहेत? असा सवाल करत सरकारला घेरणार आहेत. स्थानिकांच्या भूमिकेला मराठी एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे.
दादर येथील कबुतरखाना बंद केल्याप्रकरणी प्रथमच शांतताप्रिय असलेला जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनात जैन समाजातील पुरुषांसमवेत महिलाही सहभागी झाल्या आहेत. यामुळे परिसरातील स्थानिक मराठी नागरिकांना तसेच वास्तव्यास असलेल्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. या प्रकरणी १३ ऑगस्ट रोजी स्थानिक मराठी नागरिक घटनास्थळी दाखल होऊन निवेदन सादर करणार आहेत. तसेच पोलिसांना धक्काबुक्की करणारे, चाकू-सुरी आणणारे, कोर्टाचा अवमान करणारे अजूनही मोकाट का फिरत आहेत? असा जाब सरकारला विचारणार आहेत. दरम्यान, स्थानिकांच्या या मागणीला मराठी एकीकरण समितीने देखील पाठिंबा दिला असून १३ तारखेला मराठी एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते याठिकाणी दाखल होणार आहेत. कायदा मोडणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई न झाल्यास दादरमधील कबुतरत्रस्त नागरिक आंदोलन करतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
सुरक्षा वाढवली
मुंबईतील दादर परिसरातील कबुतरखान्यावर काही दिवसांपूर्वी घातलेले ताडपत्रीचे आच्छादन आंदोलनकर्त्यांनी काढून टाकल्यानंतर, शहर महापालिकेने पुन्हा ते ठिकाण प्लास्टिकच्या पत्र्यांनी झाकले असल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि नागरिकांनी कबुतरांना खाऊ घालू नये, यासाठी परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांनी कबुतरांना खाऊ घालण्यापासून परावृत्त व्हावे, यासाठी ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून, महापालिकेने आपल्या मार्शल कर्मचाऱ्यांची तैनातीही केली आहे, असे त्यांनी सांगितले.
कबुतरांना खायला दिल्याबद्दल तीन गुन्हे
आदेशांचे उल्लंघन करून कबुतरांना खायला दिल्याबद्दल ऑगस्टमध्ये मुंबई पालिकेने तीन पोलीस गुन्हे दाखल केले आहेत आणि ६४ जणांना एकूण ३२,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तीन एफआयआरमध्ये डी वॉर्डमधील एक आहे. यामध्ये चार 'कबुतरखाना' (कबुतरखाना) आहेत आणि जी नॉर्थ वॉर्डमधील दोन आहेत. त्यात दादर (पश्चिम) येथे कबुतरखाना आहे.
बुधवारी जैन समाजाची बैठक
दादर कबुतरखान्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे कबुतरखान्यासंबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल, अशी माहिती जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांनी जी काही भूमिका घेतली असेल त्यानंतर न्यायालयाचा जो निर्णय होईल त्या निर्णयाची समीक्षा करून पुढील भूमिका ही एकत्रितपणे ठरवली जावी. यासाठी १३ ऑगस्ट रोजी जैन समाजाची उच्चस्तरीय बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. बैठकीपूर्वी जैन समाजातल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी माध्यमावर प्रतिक्रिया देऊ नयेत, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अनादर होईल अशा प्रकारचे कृत्य करू नये, असे आवाहनही ललित गांधी यांनी केले आहे.