मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे लोकलचा अपघात टळला; माटुंग्याजवळ स्लो मार्गावरील घटना

लोकल विस्कळीत झाल्याने धीम्या मार्गावरून सीएसएमटीकडे आणि कल्याण दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकल नसल्याने प्रवाशांना तब्बल २० ते ३० मिनिटे रेल्वे स्थानकावर लोकलची प्रतीक्षा करावी लागली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा स्थानकाजवळ डाऊन स्लो मार्गावर रेल्वे रुळाला शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तडा गेला. कल्याण लोकलचे मोटरमन देवेंद्र कुमार यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ लोकल थांबविली. मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे लोकलचा अपघात टळला. या घटनेमुळे डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सुमारे अर्धा तास उशिराने धावत होत्या.

माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रुळाला तडा गेला. त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा खोळंबली. लोकल अर्धा तास विस्कळीत झाल्याने सायन, कुर्ला आणि त्यापुढील स्थानकांमध्ये फलाटावर प्रवाशांची गर्दी झाली होती. धीम्या मार्गाला तडा गेल्याने दोन धीम्या लोकल सेवा भायखळ्यावरून जलद डाऊन दिशेने वळवण्यात आल्या. त्यामुळे सीएसएमटीपासून कल्याणपर्यंत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली.

प्रवाशांचे हाल

मोटरमनने रुळाला तडा गेल्याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. हे काम दुपारी १.३९ वाजता पूर्ण झाले. लोकल विस्कळीत झाल्याने धीम्या मार्गावरून सीएसएमटीकडे आणि कल्याण दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकल नसल्याने प्रवाशांना तब्बल २० ते ३० मिनिटे रेल्वे स्थानकावर लोकलची प्रतीक्षा करावी लागली.

logo
marathi.freepressjournal.in