उमेदवारी अर्ज भरताय, सावध व्हा! ...तर रद्द होईल उमेदवारी; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईसह ठाणे, पालघरच्या १० जागांसाठी आजपासून (शुक्रवार) अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.
उमेदवारी अर्ज भरताय, सावध व्हा! ...तर रद्द होईल उमेदवारी; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ही नामनिर्देशन पत्रे भरतेवेळी उमेदवारासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होतात. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या, वाहने, केला जाणारा खर्च इत्यादींची छायाचित्रांसह व व्हिडीओ शूटिंग करण्याचे निर्देश 'दक्षिण मध्य मुंबई'चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे अपर आयुक्त विकास पानसरे यांनी दिले आहेत. व्हिडिओ शूटिंगच्या तपासणीत अधिकचा खर्च आढळल्यास संबंधितांची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलीस दल व मुंबई महापालिकेकडे असणारे आवश्यक ते सीसीटीव्ही फुटेज देखील काळजीपूर्वक पडताळून पाहण्याचे आदेशही पानसरे यांनी दिले आहेत.

'ओल्ड कस्टम इमारती'च्या सभागृहात गुरुवारी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना पानसरे यांनी हे आदेश दिले आहेत. या बैठकीला भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी प्रवीण मुंडे यांच्यासोबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलीस दलातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या सर्व संबंधित बाबी पडताळल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार निर्धारित करण्यात आलेल्या दर पत्रकाच्या आधारे वाहन खर्च, खाद्यपदार्थ खर्च, पेय पदार्थ, प्रचार साहित्य इत्यादींसाठीच्या विविध खर्चाचे निर्धारण करावे‌. जेणेकरून सदर खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करता येईल. त्याचबरोबर वाहनांवर झेंडे व प्रचार साहित्य लावण्यासाठी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व आरटीओ यांची परवानगी घेणे आवश्यक असते. अशा प्रकारची परवानगी न घेता झेंडे लावल्याचे आढळून आल्यास सदर वाहने आचारसंहिता संपेपर्यंत अडकवून ठेवण्याची कारवाई करण्याचे आदेशही बैठकीत दिले.

...तर उमेदवारी रद्द

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराने त्याचा प्रचार करताना केलेला खर्च हा निर्धारित रकमेपेक्षा अधिक आढळून आल्यास भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचे प्रस्तावित करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी पानसरे यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांसोबत जास्तीत जास्त ३ वाहने व ५ व्यक्तींनाच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येण्याची मुभा असेल, असेही पानसरे यांनी नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in