गिरीश चित्रे/मुंबई
एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना, असा न्यायनिवाडा केंद्रीय निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. न्यायालयाचा तसेच विधीमंडळाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र मतदारराजाच्या मनात खरी शिवसेना कोणाची? याचा उलगडा ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहे. शिवसेना विरुद्ध भाजप किंवा शिवसेना-भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी असा सामना याआधीच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना आमनेसामने उभे ठाकले आहेत. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई व उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागांसह ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची? हे मतदारराजाचा कौल कुणाला मिळतो, यावरून ४ जूननंतरच स्पष्ट होणार आहे.
२०१९ मध्ये शिवसेना व भाजप या दोन मित्रपक्षांमध्ये राजकीय शत्रूत्व निर्माण झाले आणि आज दोन मित्रपक्ष राजकीय वैरी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना दोन पक्षांमध्ये विभागली गेली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे शिवसेना कोणाची? ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना, अशी मान्यता दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिंदे व ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकले आहेत. लोकसभा निवडणुकीत आमचीच खरी शिवसेना, असा ठसा उमटवण्याचा प्रयत्न शिंदे व ठाकरेंच्या शिवसेनेकडून होत आहे. मात्र खरी शिवसेना कोणाची, याला मतदारराजा कोणाला मान्यता देतो, याकडे कट्टर शिवसैनिकांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी कट्टर शिवसैनिकांची तोबा गर्दी झाली होती. मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, अशी ठाम भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. त्यानंतर मुंबईवर शिवसेनेचे अधिराज्य आहे. मात्र आता राज्यात शिंदे व ठाकरेंची शिवसेना अशा दोन गटांत शिवसेना विभागली गेल्यामुळे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात सर्वजण जुंपले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंच्या शिवसेनेला मान्यता दिली असली तरी मतदारराजाच्या पसंतीस कुठली शिवसेना आहे, याचे उत्तर ४ जूननंतरच मिळणार आहे.
दक्षिण मुंबई
शिंदेंची शिवसेना - यामिनी जाधव
ठाकरेंची शिवसेना - अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई
शिंदेंची शिवसेना - राहुल शेवाळे
ठाकरेंची शिवसेना - अनिल देसाई
मुंबई उत्तर पश्चिम
शिंदेंची शिवसेना - रवींद्र वायकर
ठाकरेंची शिवसेना - अमोल किर्तीकर
ठाणे मतदार संघ
शिंदेंची शिवसेना - नरेश म्हस्के
ठाकरेंची शिवसेना - राजन विचारे
कल्याण मतदार संघ
शिंदेंची शिवसेना - श्रीकांत शिंदे
ठाकरेंची शिवसेना - वैशाली दरेकर