
मुंबई : मुंबईत विशेष करून पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न चिघळला असून आता खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर होणार आहे. मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे दिवसा जाऊन प्रत्यक्ष बघा आणि रात्री बुजवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते अभियंत्यांना दिले आहेत. तसेच खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डांतील सहाय्यक आयुक्तच नोडल अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी भेट देऊन अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांना मुंबईतील रस्ते दुरुस्तीला वेग देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे व माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.
सततच्या पावसामुळे तयार होणारे खड्डे लवकरात लवकर भरावेत, खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालय स्तरावर मंजूर केलेल्या निधीचा पुरेपूर वापर करावा, खड्डे भरण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, कोल्ड मिक्स, मास्टिक यापैकी योग्य त्या पद्धतीचा अवलंब करावा, सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने या कालावधीत अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी आपल्या विभागात रस्त्यांची दिवसा पाहणी करावी. तसेच लगोलग रात्रीच्या वेळेत खड्डे बुजवण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश वेलरासू यांनी बैठकीत दिले. तसेच खड्डे बुजवल्याचा अहवाल सादर करा, असे आदेशही वेलरासू यांनी रस्ते अभियंत्यांना दिले आहेत. काँक्रिट रस्ते आणि डांबराचे रस्ते तसेच दोन रस्त्यांमधील पॅच हे रॅपिड हार्डनिंग काँक्रिटने भरून पुनर्पृष्टीकरण करण्यात यावे, तसेच प्रकल्प रस्त्यांसाठीही रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा वापर करावा, असे वेलरासू यांनी सांगितले.
तर कंत्राटदाराला दुप्पट दंड
मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील खड्ड्यांच्या तक्रारी प्रामुख्याने प्रकल्प रस्त्यांबाबतच्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या सुस्थितीसाठी परिरक्षणाबाबतीत कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर प्रसंगी दुप्पट दंड आकारणी आणि कठोर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
इतर एजन्सीकडून खर्च घेणार
रस्ते दुरुस्तीच्या कामात ‘एमएमआरडीए’, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या विविध प्राधिकरणांसोबत समन्वय साधून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्यात. तसेच कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्याबाबत तक्रार असली तरीही खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा देण्याला प्राधान्य द्यावे, या स्वरूपाच्या कामांचा खर्च संबंधित यंत्रणांकडून घेण्यासाठी नंतर परतावा शुल्क वसुली सादर करता येतील, असेही वेलरासू यांनी स्पष्ट केले.