वर्ष २०२४ मध्ये हरवला एलिवेटेड हेरिटेज वॉकवे? नवे वर्ष सुरू होऊनही प्रकल्प सुरू नाहीच

सिंगापूरच्या जंगलातील प्रसिद्ध एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेची प्रेरणा घेऊन मलबार हिल परिसरात मुंबईच्या सौदर्यात भर टाकणारा नवा प्रकल्प पहिली तरंगती पायवाट म्हणजेच एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे बांधण्यात येत आहे.
वर्ष २०२४ मध्ये हरवला एलिवेटेड हेरिटेज वॉकवे? नवे वर्ष सुरू होऊनही प्रकल्प सुरू नाहीच
एक्स @haldilal
Published on

पूनम पोळ / मुंबई

सिंगापूरच्या जंगलातील प्रसिद्ध एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेची प्रेरणा घेऊन मलबार हिल परिसरात मुंबईच्या सौदर्यात भर टाकणारा नवा प्रकल्प पहिली तरंगती पायवाट म्हणजेच एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे बांधण्यात येत आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२४ मध्ये पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता होती. मात्र, प्रकल्पाच्या कामाचा शेवटच्या टप्याचे काम अद्याप बाकी आहे. यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात तरी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता नसल्य़ाचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मलबार हिलच्या हिरव्यागार गर्द झाडीतून हा एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे तयार करण्यात आला आहे. या ठिकाणावरून गिरगाव चौपाटीचे सौंदर्य पाहायला मिळणार आहे. ४८२ मीटर लांबीच्या या एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेचे आतापर्यंत अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हा वॉकवे बांधत असताना मर्यादित कामाच्या तासांपर्यंत वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासह अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले . कोणत्याही झाडांना हानी न पोहचवता हा वॉकवे तयार करण्यात आला आहे. अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेचे काम अर्ध्याहून अधिक पूर्ण झाले आहे. पण अद्याप पूर्ण स्वरूपात झालेले नाही, या महिनाभरात तिकिट घर आणि अन्य बाबी पुर्ण करण्याचा आमचा मानस आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत २५ कोटीहुन अधिक रुपये खर्च झाला आहे.

कसा असेल याचा वॉकवे?

वॉकवेमागे सिंगापूरच्या जंगलातील प्रसिद्ध एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेची प्रेरणा आहे. हा ४८२ मीटरचा एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवे मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कपासून सुरू होणार असून तो डूंगरवाडी इथपर्यंत आहे. या एलिवेटेड फॉरेस्ट वॉकवेवरून जाताना मुंबईकरांना निसर्गरम्यतेचा अनुभव घेता येणार आहे. अतिशय सुंदररित्या लाकडापासून तयार करण्यात आला असून तो साकारताना कमीत कमी सिमेंट काँक्रिटचा वापर करण्यात आला आहे. या वॉकवेवरून चालताना अरबी समुद्राचे सौंदर्य अनुभवता येणार आहे. यासाठी आतापर्यंत २५ कोटी रूपयांचा खर्च आला आहे. यापुढील कामासाठी खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पालिका अधिकारी यांनी सांगितले.

पर्यटकांना करावी लागणार प्रतिक्षा

मलबार हिल्स परिसरामध्ये हिरवीगार झाडी आहेत. वॉकवे तयार करताना या झाडांचे संरक्षण करणे खूपच महत्वाचे होते. झाडे वाचवण्यासाठी अनेकवेळा वॉकवेचे संरेखन बदलण्यात आले. त्यामुळे वॉकवेची लांबी कमी झाली तर २.२ मीटर रुंद असलेला हा वॉकवे जवळपास १ किलो मीटरचा असेल. त्याची वहन क्षमता सुमारे ५०० किलो/चौरस मीटर इतकी आहे. ज्या खांबावर हा वॉकवे उभारण्यात आला आहे ते काँक्रीटऐवजी स्ट्रक्चरल स्टील वापरून बनवण्यात आले आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये हा पर्यटकांसाठी खुला होणे अपेक्षित होते.

logo
marathi.freepressjournal.in