मुंबईत हक्काचं घर होण्याचं स्वप्न लवकरच पुर्ण होणार! म्हाडाच्या घरांसाठी 'या' तारखेला निघणार सोडत

अनेक दिवसांपासून सुरु असलेली प्रतिक्षा आता संपुष्टात आली असून मुंबईतील म्हाडाच्या ४०८२ घरांच्या विक्रीसाठीची तारीख अखेर निश्नित करण्यात आली आहे
मुंबईत हक्काचं घर होण्याचं स्वप्न लवकरच पुर्ण होणार! म्हाडाच्या घरांसाठी 'या' तारखेला निघणार सोडत
Published on

म्हाडांच्या ४०८२ घरांच्या विक्रीसाठीची तारीख अखेर निश्नित करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून यासाठी अर्ज केलेल्या नागरिक याबाबत प्रतिक्षा करत होते. अखेर आता तो दिवस जवळ आला आहे. ज्या दिवशी याबाबत म्हाडाच्या लॉटरींची सोडत निघेल. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) लॉटरीची सोडत तारखा निघणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

यावेळी प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना सावे म्हणाले की, अशा गृहनिर्माण योजनांसाठी जमीन संपादन करण्याऐवजी बेट शहरातील पुनर्विकास प्रक्रियेला चालना कशी देता येईल यावर सरकार विचार करेल. अतुल सावे पुढे बोलताना म्हणाले की, सध्या सुरु असेल्या सोडतीत म्हाडाला मुंबईतील ४,०८२ घरांच्या विक्रीसाठी १,२०,१४४ अर्जांमधून र् ५१९ कोटी बयाणा जमा झाले आहेत. हा डेटा गृहनिर्माण लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपासून जवळपास एक महिना आहे. असं त्यांनी सांगितलं.

ज्या दिवशी म्हाडाची सोडत पार पडणार आहे.त्या दिवशी मंत्री उपस्थित राहणार आहेत, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रंगशारदा सभागृहात उपस्थित असतील, असं सावे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या सोडतीत १ लाख २० हजार १४४ पात्र अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in