मुंबई: लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली असतानाच गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. गणेशोत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवा, पण फक्त तीनच दिवस. पाचव्या दिवशी गौरी-गणपतीचे विसर्जन असल्यामुळे सातव्या दिवशीची १२ वाजेपर्यंतची परवानगी राज्य सरकारने रद्द केली आहे. लाऊडस्पीकर वाजवण्यासाठी दिवस वाढवून देण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून होत असताना राज्य सरकारने एक दिवस कमी केल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
१९ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत विराजमान होणाऱ्या
बाप्पाचे आगमन होत आहे. मंडपात सजावट सुरू असून लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले आहेत. यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी भक्त व मंडळांनी तयारी केली असून चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी असल्याने भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता. गणेशोत्सवात इतर दिवशी रात्री १० वाजेपर्यंत असणारी परवानगी अपुरी पडते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून सर्व दहा दिवस १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात येत होती, मात्र असलेल्या चार दिवसांतील एक दिवस कमी केल्याने मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याच्या परवानगीचे दिवस वाढवण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती, मात्र असलेल्या चार दिवसांच्या परवानगीत एक दिवस कमी करण्यात आला आहे. याबाबत समन्वय समितीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
फक्त याच दिवशी लाऊडस्पीकर वाजवा!
राज्य सरकारच्या निर्देशानुसार यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्याप्रमाणे १५ पैकी ११ दिवसांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवातील तीन दिवस, नवरात्रोत्सवातील दोन दिवस, दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि ख्रिसमसनिमित्त २४ आणि ३१ डिसेंबर या दिवशी रात्री १२ पर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार आहे.